कल्याण – कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात सौर उर्जेवर चालणारी एक खांबी फिरती वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. या फिरत्या सिग्नल यंत्रणेचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. एक महिनाभर या सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कल्याण शहराच्या विविध भागात करता येतील, याचा अभ्यास करून स्मार्ट सिटी प्रकल्पांततर्गातील सिग्नल यंंत्रणा कल्याण शहराच्या विविध भागातील चौक, रस्त्यांवर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
कल्याण शहरातील अरुंद रस्ते, चौक आणि त्यात वाढलेली वाहन संख्या. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. वाहतूक विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने प्रत्येक चौक, रस्त्यावर वाहतूक विभागाला वाहतूक पोलीस, सेवक तैनात करणे शक्य होत नाही. या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाने सौर उर्जा माध्यमातून चालणारी एक खांबी फिरती सिग्नल यंत्रणेचा प्रयोग कल्याण शहरात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही चाचण्या, अनुभव न घेता स्मार्ट सिटी वाहतूक सिग्नल शहरात बसविले. या सिग्नलच्या यंत्रणेत काही तांत्रिक अडचणी आल्या तर पालिकेचा पैसा फुकट जायला नको म्हणून पहिले प्रायोगिक तत्वावर हा पथदर्शी प्रकल्प कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात राबविला जात आहे.
गुरुवारी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत, उपअभियंता भागवत पाटील यांनी वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने सहजानंद चौकात हा फिरता सिग्नल उभारला. सौर उर्जेवर ही यंत्रणा चालते. सहजानंद चौकातून चार ते पाच ठिकाणी अंतर्गत रस्ते जातात. विविध पोहच रस्ते असलेल्या चौकाची या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली आहे, असे भागवत यांनी सांगितले.
सिग्नलचे नियोजन
या सौर उर्जेवरील वाहतूक सिग्नलच्या पथदर्शी प्रकल्पातून चौक, रस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी झाली तर ही कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यामधील कोणत्या भागाचे दुभाजक काढून टाकायचे, कोणता दुभाजक मागे घेऊन तेथे त्याची पुनर्उभारणी करायची, कोणता रस्ता एक मार्गिका करायचा, रस्त्यामधील पथदिव्यांचा वाहनांना अडथळा होत असेल तर ते पथदिवे कोणत्या भागात स्थलांतरित करायचा. कोणत्याही चौक, रस्त्यावर कोंडी होऊ नये याचा अभ्यास या पथदर्शी सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानंतर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून सिग्नल यंत्रणा बसविण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत, असे भागवत यांनी सांगितले.
कल्याण शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वाहतूक सिग्नल बसविण्यापूर्वी ही यंत्रणा कशा पध्दतीने बसविली जावी याचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी सौर उर्जेवरील एक खांबी फिरती सिग्नल यंत्रणा सहजानंद चौकात बसवली आहे. महिनाभर या सिग्नल यंत्रणेचा अभ्यास केल्यानंंतर स्मार्ट सिटी प्रकल्पातील सौर उर्जेवरील सिग्नल कल्याणमध्ये बसविण्याची कामे हाती घेतली जातील. – प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग.