‘बाजीराव मस्तानी’ बाबतच्या वादानंतरही पालक-विद्यार्थ्यांची मात्र पसंती
डिसेंबर महिना म्हणजे शाळांचा स्नेहसंमेलनाचा हंगाम. शहरातील शाळांमध्ये स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम सुरू असून या संमेलनात ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटातील वादग्रस्त ठरलेल्या पिंगा गाण्याने पालक आणि पाल्यांवर अक्षरश भुरळ पाडल्याचे चित्र दिसू लागले आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पिंगा हे गीत वादाच्या भोवऱ्यात सापडले. सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रियाही येऊ लागल्या होत्या. तरीही शाळांच्या संमेलनात या गीतास शाळांनी तसेच पालकांनीही विशेष पसंती दिली असून िपगावर आधारित नृत्यांचा भडिमार यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील पिंगा या गाण्यात बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी एकत्रित नृत्य करताना दाखविण्यात आले आहेत. हे नृत्य इतिहासाशी साधम्र्य साधणारे नाही असा सूर एकंदर मराठी समाजातून उमटला. असे असले तरी कल्याण-डोंबिवली परिसरातील शाळांच्या व्यवस्थापन आणि पालकांनी मात्र हे वादग्रस्त गाणे उचलून धरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळेतील स्नेहसंमेलनांत या गाण्यावर नृत्य बसविण्याकडे शिक्षक आणि पालकांचा कल दिसून आला. संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गीतावर ऐश्वर्या राय व माधुरी दीक्षित यांची पावले एकत्रित थिरकली होती. या गीतालाही शाळेतील स्नेहसंमेलनांत मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर आता प्रियांका चोप्रा व दीपिका पदुकोन यांनी पिंगा या गाण्यावर नृत्य केले आहे. या गाण्यावर दोघींनी केलेले नृत्य चांगले आहे. तसेच गाणेही चांगले असल्याने प्रेक्षक ते पाहतात व त्यात आम्हाला काही गैर वाटत नसल्याने आम्ही यंदाच्या स्नेहसंमेलनात हे गाणे बसविले असल्याची प्रतिक्रिया शिक्षिकेने दिली.
हल्लीची मुले टीव्हीवर वारंवार झळकणाऱ्या नृत्याचा प्रत्येक ठेका लगेच हेरतात. त्यांना तो सहज जमूनही जातो. अशा वेळेस त्यांना जे लक्षात राहील, जे लवकर जमेल असे नृत्य करण्यास आम्ही पसंती देत असल्याचे अश्विनी चांदेकर या पालकांनी सांगितले. सोशल मीडियावर या गाण्याविषयी आक्षेप घेतला नाही तर केवळ काशी आणि मस्तानी एकत्र नाचल्याचे दाखविण्यात आल्याने विरोध झाला होता. नृत्य आमच्या मते सुंदर झालेले असल्याने आम्हाला काही गैर वाटले नाही.
साधी नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या पद्धतीने मुलींना तयार करून आम्ही स्नेहसंमेलनात सहभागी झालो. आणि यासाठी खास तयार वेशभूषा, दागिने खरेदी करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे नऊवारी परिधान करून नृत्यपूर्व तयारी पूर्ण होत असल्याने मुले आणि पालक दोन्ही खूश असल्याचे राजश्री शिंदे या शिक्षिकेने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा