ठाणे : घोडबंदर भागात एका खाजगी कंपनीकडून सुरु असलेल्या खोदकामा दरम्यान गॅस वाहिनी फुटली. यामुळे या भागातील साडेपाचशेहून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. ही वाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरु असून रात्री ११ वाजेपर्यंत गॅस वाहिनी सुरळित सुरु होईल अशी माहिती महानगर गॅस कंपनीच्या वतीने देण्यात आली. परंतू, गॅस वाहिनी खंडीत झाल्यामुळे रात्रीचा स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न गृहिनींसमोर निर्माण झाला आहे.

घोडबंदर भागातील साईनाथ नगर परिसरात खासगी कंपनीचे खोदकाम सुरु होते. या कामा दरम्यान,सायंकाळी ४ वाजता महानगर गॅस कंपनीच्या गॅस वाहिनीला धक्का बसला आणि वाहिनी फुटली. या घटनेची माहिती मिळताच, महानगर गॅस कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिणामी, घोडबंदर भागातील कासारवडवली, साईनाथ नगर, आनंद नगर यासह अन्य परिसरातील साडेपाचशे हून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे.

ऐन सायंकाळच्या वेळी गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे रात्रीचा स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न गृहिनींसमोर निर्माण झाला आहे. तर, गॅस वाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असून रात्री ११ वाजेपर्यंत गॅस पुरवठा पूर्ववत होईल असे महानगर कंपनीकडून सांगण्यात आले. गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे आता बाहेरुन रात्रीचे जेवण मागवावे लागणार असून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया या भागातील एका नागरिकाने दिली.