पावसाळ्यापूर्वी खड्डे खडी, डांबरीकरणाने व्यवस्थित भरले तर मुसळधार पाऊस असला तरी रस्त्यांवर लवकर खड्डे पडत नाहीत. परंतु पालिकेच्या शहर अभियंता विभागाने ही कामे मे महिन्यापूर्वीच पूर्ण केली नाहीत. पाऊस सुरू झाला तेव्हा पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचा फटका आता प्रवाशांना खड्डे, तुंबलेले पाण्याच्या माध्यमातून बसत आहे.

रस्त्यांवर खड्डे पडूनही कोणीही अधिकारी त्याची दखल घेत नव्हता. प्रवाशांनी अनेक तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बुधवारी अनेक दिवसाच्या रजेनंतर कार्यालयात हजर होताच, तत्काळ कामचुकार अधिकाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत.

दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले –

मुसळधार पाऊस सुरू असताना खड्डयांमध्ये खडी, मातीचा गिलावा एकत्र करून टाकला जातो. या खड्डयांवरून सतत वाहनांची वर्दळ असल्याने सकाळी खडी, मातीने भरलेले खड्डे संध्याकाळी उघडे पडत आहेत. अनेक ठिकाणी खडीचा चुरा खड्ड्यांमध्ये टाकला जात आहे. या लहान आकाराच्या दगडींच्या चुऱ्यावर दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे खड्ड्यांची भीती आणि आता खडी वरून घसरण्याची भीती असे चित्र कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवर निर्माण झाले आहे.

खड्ड्यात पडून दोन ज्येष्ठ नागरिकांचा हात मोडला –

खड्डयांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत पालिका हद्दीतील सुमारे दोनशेहून अधिक शाळांच्या बस एकावेळी शहरात विद्यार्थी वाहतुकीसाठी येतात. शहरातील वाहन संख्या वाढली आहे. खड्ड्यांमुळे बस वाहतूक करणाऱ्या बसना शाळेत पोहचण्यास, घरी विद्यार्थ्यांना पोहचण्यास विलंब होत असल्याने पालक, शिक्षकांमध्ये पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कारभारा विषयी नाराजी आहे. खड्ड्यात पडून कल्याण मधील टिळक चौकात दोन ज्येष्ठ नागरिकांचा हात मोडला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये रवींद्र पै हे सनदी लेखापाल आहेत. त्यांनी याप्रकरणी आपण पालिका आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, असे सांगितले. जिल्हा ग्राहक मंचाकडे रुग्णालय खर्चाची भरपाई पालिकेकडून मिळण्यासाठी दावा दाखल करणार आहोत. हे पैसे या रस्त्यावरील खड्ड्याला जबाबदार अधिकाऱ्यांच्या वेतनातून कापावेत, अशी मागणी आपण मंचाकडे करणार आहोत, असे सनदी लेखापाल रवींद्र पै यांनी सांगितले.

Story img Loader