|| ऋषीकेश मुळे
वर्षभरापूर्वी खर्च केलेले साडेचार कोटी पाण्यात :- ठाणे, नवी मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील अजस्र अशा वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेले मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे पितळ अवघ्या वर्षभरातच उघडे पडले असून तीन महिने कोसळलेल्या मुसळधार पावसात हा संपूर्ण रस्ता पुन्हा एकदा खड्डय़ात गेल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुरुस्तीसाठी चार महिने हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. थोडाथोडका नव्हेत तर साडेचार कोटी रुपयांचा निधी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात आला होता. असे असताना दुरुस्ती करण्यात आलेला हा संपूर्ण रस्ता जागोजागी उखडला गेला असून बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याविषयी मूग गिळून असल्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावर कोंडी होऊ लागली आहे.
उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून सुरू असते. या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याची बाब पुढे येताच गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस येथील कामास सुरुवात करण्यात आली. या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र चार महिन्यांनी हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला; परंतु वर्षभरातच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. बावळण रस्त्याच्या खालील भागातील बांधकामाच्या लोखंडी सळ्या उखडून वर आल्या आहेत. पुलांच्या सांध्यांच्या ठिकाणी जुळणीचे नटबोल्टही उखडून वर आले आहेत. तसेच पुलाचा बराचसा भाग उंच-सखल झाला आहे. दोन्ही मार्गिकांवरील रस्त्याची अशी बिकट अवस्था पाहायला मिळत आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अभियंता आशा जठाळ यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.
मुंब्रा बाह्यवळण रस्ता खराब झाल्यामुळे येथून भिवंडीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांचा भार पुन्हा एकदा ठाणे-बेलापूर रस्ता तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर येऊ लागला आहे.
निवडणुकीत मुद्दा बनणार?
निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना ठाणे जिल्ह्य़ातील उमेदवारांकडून मतदारांना प्रचार रॅली आणि वचननाम्यांद्वारे विविध आश्वासने देण्यात येत असली तरी दुसरीकडे प्रवाशांना अद्याप खड्डेमय रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध आश्वासने मतदारांपुढे मांडत असतात. मात्र खड्डय़ांच्या दुरवस्थेविषयी संबंधित यंत्रणा ढिम्म असल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे.