ठाणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. बुधवारी कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे फलक उभारले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे ठाण्यातही राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – केडीएमटीच्या बसमधून प्रवाशाच्या बटव्याची चोरी
बुधवारी नजीब मुल्ला समर्थकांनी थेट आव्हाड यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या चौकात फलक उभारले आहे. नजीब मुल्ला यांचे समर्थक मोहसिन शेख, तकी चेऊलकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची नावे आणि छायाचित्र या फलकावर आहेत. तसेच शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाला छायाचित्र लावण्यास विरोध केला असतानाही या फलकावर शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, सुनील तटकरे आणि नजीब मुल्ला यांचे छायाचित्र आहेत.