मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर गेल्या काही वर्षांमध्ये नाहूर, कोपरसारखी नवी स्थानके उभारण्यात आली आहेत. याच धर्तीवर अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान, नवे चिखलोली हे स्थानक व्हावे या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना आता ‘चिखलोली’ या नव्या स्थानकाचे वेध लागले आहेत. अंबरनाथ हद्दीतील चिखलोली या गावामध्ये रेल्वेचे हे स्थानक व्हावे यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या या स्थानकामुळे या दोन्ही स्थानकांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
चिखलोली स्थानक व्हावे यासाठी येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधी १९७८ पासून मागणी करीत आहेत. खासदारांकडून त्या संदर्भात पाठपुरावे करणारी पत्रे पाठवण्यात आली आहेत. मात्र विरळ लोकवस्तीच्या या भागामध्ये लोकल गाडय़ांना थांबा देण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला निरुत्साह दाखवला होता. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये चिखलोली परिसरातील लोकसंख्येत वाढ झाली आहे. शिवाय अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या दिशेने नवनवी गृहसंकुले उभी राहत आहेत. या वाढत्या लोकसंख्येचा प्रवासी भार अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही स्थानकांवर भार पडू लागला आहे. डोंबिवलीच्या नंतरची सर्वाधिक गर्दीची स्थानके म्हणून या स्थानकांची ओळख झाली आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांच्या मध्यावर ‘चिखलोली’ हे स्थानक व्हावे, अशी मागणी वाढू लागली असून रेल्वेनेसुद्धा या संदर्भातील अभ्यास पूर्ण केला आहे.
कर्जत-कल्याण प्रवास सोईचा
कल्याणपासून कर्जतपर्यंत सध्या केवळ दोन रेल्वे मार्ग अस्तित्वात असून त्यावरून लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ांसह मालगाडय़ांचीही वाहतूक सुरू आहे. या रुळांवर एखाद्या गाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्यास या भागातील संपूर्ण वाहतूक खंडित होते. ते टाळण्यासाठी रेल्वेच्या २०१३-१४ अर्थसंकल्पात कल्याण-कर्जत तिसऱ्या रेल्वेमार्गाची घोषणा करण्यात आली आहे. या भागातून अधिकचा रेल्वे रूळ टाकण्यात आल्यास लोकल गाडय़ांची संख्या वाढवण्यास त्याची मदत होऊ शकणार आहे. शिवाय लोकल गाडय़ांवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल.
सद्यस्थिती : रेल्वेच्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात या रेल्वे रुळाला मंजुरी मिळाली असली तरी त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. रेल्वेने नुकतेच या भागातील रेल्वे रुळांच्या आजूबाजूच्या परिसराचे सर्वेक्षण केले आहे. शिवाय स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून जागेसंदर्भातील तांत्रिक दोष दूर करण्यास सुरुवात झाली आहे.
स्थानकांसाठी पायाभूत सुविधा..
कल्याणच्या पुढे स्थानकांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा या दृष्टीने येथील रेल्वे प्रवासी संघटना सतत रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत आहेत. येथील सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा दलामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने या भागात नवे रेल्वे पोलीस ठाणे निर्माण व्हावे, प्रत्येक स्थानकाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संरक्षण मिळावे, अशी मागणी येथून होत आहेत. या भागातील फाटक ओलांडण्यासाठी आणि वाहतुकीसाठी पुलाची मागणी आहे. वांगणी येथे कारशेडची निर्मिती करण्यात आल्याने कर्जतकडून येणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे मनोहर शेलार यांनी दिली.