यंदाच्या पावसाळ्यादरम्यान शहरातील रस्त्यालगत असलेली विदेशी प्रजातीचे वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच, दुसरीकडे शहरात मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे देशी प्रजातीच्या वृक्षांची वनराई फुलविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर ही वनराई फुलविण्यात येणार असून त्यासाठी शहरातील आठ जागांची निवड वृक्ष प्राधिकरण विभागाने केली आहे. विशेष म्हणजे, विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून हे प्रकल्प राबविले जाणार असल्याने त्यासाठी पालिकेचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडून त्याप्रमाणे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला होता. लागवडीनंतर वृक्ष जगावेत, याची काळजी पालिकेने घेतली होती. त्यासाठी दोन ते तीन फुटांच्या वृक्षांची लागवड केली होती. परंतु काही ठिकाणी पाण्याअभावी ही वृक्ष जगलीच नाहीत. त्यात यापुर्वी शहरात मोठ्या प्रमाणात विदेशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून हे वृक्षच उन्मळून पडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच यापुढे देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेऊन त्या प्रमाणे वृक्ष लागवड केली जात आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही शहरात मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे वृक्ष लागवड करणार असल्याचे सुतोवाच केले होते.
हेही वाचा >>>कल्याण मध्ये वडवली येथे निर्मल लाईफ संकुलाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण
आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई शहरामध्ये मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे वनराई फुलविण्याचा उपक्रम राबविला होता. त्यांनी पाम बीच मार्ग तसेच कौपरखैराणे परिसरात हा उपक्रम राबविला असून त्याठिकाणी वनराई फुलली आहे. त्याच धर्तीवर त्यांनी ठाणे शहरातही वनराई फुलविण्यासाठी प्रयत्न सुुरु केले आहेत. यासाठी त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागांना जागेचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार या विभागाने शहरातील आठ जागांचा शोध घेतला असून त्यामध्ये मुल्लाबाग येथील निसर्ग उद्यान, मोघरपाडा भागातील रस्ता दुभाजकामधील भाग, मोघारपाडा येथील मोकळे भुखंड, कोपरी पुलाजवळी परिसर, कोपरी वन विभागाची जागा, नागलाबंदर, पारसिक विसर्जन घाट या जागांचा समावेश आहे.
ठाणे शहरात मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे देशी प्रजातीच्या वृक्षांची वनराई फुलविण्यात येणार असून त्यासाठी जागांची शोध घेऊन त्याठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून हे प्रकल्प राबविले जाणार असल्याने त्यासाठी पालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही. – अभिजीत बांगर आयुक्त, ठाणे महापालिका