डोंबिवली शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल चौक दरम्यान दररोज होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन वाहतूक विभागाने या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना सम विषम तारखांना वाहने उभी करण्याचे नियोजन केले आहे.१५ दिवस प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करण्यात येणार आहे. या नियोजना संदर्भात कोणालाही काही मत, हरकत मांडायची असेल तर त्यांनी ठाणे येथे वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर
डोंबिवली शहरातून बाहेर पडणाऱ्या मार्गांमध्ये मानपाडा रस्ता, घरडा सर्कल रस्ता आणि ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता हे महत्वाचे मार्ग आहेत. मानपाडा रस्ता येथे रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने शिळफाटाकडून येणारे सर्वच प्रवासी, वाहन चालक रिजन्स अनंतम प्रवेशव्दारा समोरुन वळण घेऊन पेंढरकर महाविद्यालय, घरडा सर्कल चौकातून शहरात प्रवेश करतात.शहरात प्रवेश करत असतानाच पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल चौक रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहने उभी असतात. पेंढरकर महाविद्यालय, एमआयडीसी कार्यालया समोर दररोज संध्याकाळी चार वाजल्यानंतर ५० हून अधिक खाऊच्या हातगाड्या या ठिकाणी उभ्या केल्या जातात. पेंढरकर महाविद्यालय तिठ्यावर माऊली सभागृहा समोर नवीन व्यापारी संकुले झाली आहेत. या संकुलात खरेदी करणारा ग्राहक रस्त्यावर वाहने उभे करुन खरेदीसाठी जातो. याठिकाणी रिक्षा वाहनतळ आहे. नवी मुंबई, केडीएमटी, एसटी बस या रस्त्यांवरुन धावत असतात. घरडा सर्कल चौकात संध्याकाळी पाच वाजल्यानंतर खासगी वाहतूकदारांच्या बस प्रवासी वाहतुकीसाठी उभ्या असतात.
हेही वाचा >>>ठाणे: माझ्याविरोधात आता कशाकशाचा वापर होतोय, ते बघुया; जितेंद्र आव्हाड यांचे विधान
खाऊसाठी संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत अनेक नागरिक आपली वाहने घेऊन येतात. त्यामुळे अभूतपूर्व कोंडी नेहमी पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल चौक दरम्यान होते. अनेक नागरिक रोटरी उद्यानात फिरण्यासाठी येतात. त्यांची वाहनेही रस्त्यावर उभी असतात. माऊली, हेरिटेज सभागृहात कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने या भागात उभी असतात. नेहमी मोकळा वाटणारा पेंढरकर महाविद्यालय ते घरडा चौक रस्ता वाहतूक कोंडीने अनेक वेळा गजबजलेला असतो. ही कोंडी सोडविण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांना या भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कळविले होते. त्याप्रमाणे हे प्रायोगिक तत्वावर हे नियोजन करण्यात आले आहे, असे वरिष्ठ निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.
हेही वाचा >>>सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीत दूषित पाण्याचा पुरवठा
वाहने उभी करण्यास बंदी
के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाचे प्रवेशव्दार ते हेरिटेज सभागृह या ४०० मीटरच्या पट्ट्यात २४ तासात वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. घरडा सर्कल चौक ते सुयोग रिजन्सी चौक रस्त्याच्या दीड किमी टप्प्यात दोन्ही बाजुला सम-विषम (पी१, पी २) पध्दतीने वाहने उभी करण्यास मुभा देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे वाहतूक विभागाने म्हटले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामधून मोकळीक देण्यात आली आहे, असे उपायुक्त डाॅ. राठोड यांनी सांगितले.
“ पेंढरकर महाविद्याल, घरडा सर्कल रस्ता भागातील वाहन कोंडीवर उपाय म्हणून हे नियोजन केले आहे. या नियोजनाने कोंडी होत नसेल तर हे नियोजन कायम ठेवले जाणार आहे.”-रवींद्र क्षीरसागर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोळसेवाडी