शोभिवंत पाना- फुलांच्या कुंडय़ा, वामन वृक्ष, कॅक्टस, सकुलंट, ब्रोमेलियास, ऑर्किडस्, गुलाब पुष्प, विविध फुलांच्या पुष्परचना, औषधी व सुगंधी वनस्पती, फळ झाडे, फळांची मांडणी, भाजीपाला, उद्यानाच्या प्रतिकृती, निसर्ग व पर्यावरण आधारीत छायाचित्र आणि रंगचित्र प्रदर्शन अशा मनोहरी वनस्पतींच्या वृक्षवल्लीने ठाण्याचे गावदेवी मैदान बहरणार आहे. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या ‘वृक्षवल्ली प्रदर्शन २०१५’च्या निमित्ताने हे अनोखे निसर्ग दर्शन ठाणेकरांना घेता येणार आहे. 

निसर्ग संवर्धनासाठी गेल्या आठ वर्षांपासून हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून यंदा या प्रदर्शनाचे नववे वर्ष आहे. गावदेवी मैदानामध्ये शुक्रवारी ३० जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या या प्रदर्शनाची सांगता १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होईल. वनस्पतींचे प्रदर्शन आणि विक्री हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी ३ वाजता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून यावेळी महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अभिनेते अविनाश नारकर उपस्थित राहणार आहेत. इनर व्हिल, रोटरी क्लब ऑफ ठाणे या संस्थांचा या प्रदर्शनासाठी सक्रिय सहभाग असणार आहे.

* ठाणेकरांना निसर्ग सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्षप्राधिकरण समितीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
* फुलझाडे, फळझाडे, भाज्या, औषधी वनस्पती यांची कलात्मक मांडणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहता येणार आहे.
* त्याच बरोबरीने निसर्ग आणि पर्यावरण यांचे छायाचित्र प्रदर्शनही इथे मांडण्यात येणार आहे.
* ठाण्यातील ३० हून अधिक खाजगी आणि शासकीय निमशासकीय संस्था या प्रदर्शनात स्टॉल मांडणार आहेत.
* या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर वनस्पतींचे सौंदर्य पाहण्याबरोबरच त्याची खरेदी करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात
आली आहे.
* त्यासाठी शोभिवंत व फुलांची रोपे व कुंडय़ा, हंगामी फुलांची रोपे, वामनवृक्ष, कॅक्टस, ब्रोमेलियास, औषधी वनस्पती, गुलाब रोप व कुंडय़ा, फळझाडे, उद्यानासाठीची अवजारे, बी-बियाणे, खत, कुंडय़ा, औषधी रोप आदींची विशेष मांडणी करण्यात येणार आहेत.

Story img Loader