उल्हास नदीतील ‘विषवल्ली’ला सांडपाण्याचे पौष्टिक
उल्हास नदीच्या प्रवाहातील जलपर्णीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता तर कल्याण-डोंबिवली शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मोहिली येथील शुद्धीकरण प्रकल्पाभोवतीही या विषवल्लीने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या काळात उदंचन केंद्राभोवतीची ही पाण वनस्पती पालिकेने काढली नाही तर, या ठिकाणाहून गाळ मिश्रित पाणी केंद्रात उचलावे लागेल, अशी भीती पर्यावरणप्रेमी व जल तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती गरज ओळखून पालिकेने मोहिली गावाजवळ सुमारे अडीचशे दशलक्ष लिटर क्षमतेचे उचंदन केंद्र सहा वर्षांपूर्वी बांधले. या नव्या कोऱ्या उदंचन केंद्रातून दोन्ही शहरांना मुबलक पाणीपुरवठा केला जातो. उचंदन केंद्रात ज्या नदी पात्रातून पाणी उचलण्यात येते, त्या परिसरात मोठय़ा प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडला आहे. जलपर्णी ही स्वच्छ पाण्याऐवजी घाण, गाळ असलेल्या पाण्यात सर्वाधिक वाढते. ती वेळीच नष्ट न केल्याने नदी पात्रातून काढणे प्रशासनाच्या हाताबाहेर गेले आहे. ही जलपर्णी नष्ट करावी, नदीची खोली वाढवावी, नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कल्याण पूर्वेतील एका माजी नगरसेवकाने गेल्या काही महिन्यांपूर्वी नदीपात्रात उपोषण केले होते.
मोहिली, मोहने या उदंचन केंद्राच्या नदीपात्रात उल्हासनगर शहरातून सोडण्यात येणारे सांडपाणी, कंपन्यांचे सांडपाणी सोडण्यात येणारे पाणी उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान नसल्याने जागोजागी साचते. या साचलेल्या पाण्यात उल्हासनगरमधून वाहून येणारे सांडपाणी येऊन मिसळते. नदीत अनेक ठिकाणी पाण्याचे डोह (खोल भाग) आहेत. या डोहांमधील पाणी वाहते नसल्याने, या साचलेल्या पाण्यावर जलपर्णी वाढते. जलपर्णीचा विळखा हळूहळू नदीचे पात्र घेरतो, असे पर्यावरणप्रेमी ललित सामंत यांनी सांगितले.
मोहने उदंचन केंद्र परिसरात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मोहिली केंद्राच्या भोवतीचे पाणी स्वच्छ, निर्मळ ठेवायचे असेल तर, जलपर्णी नष्ट करण्याचे काम पालिकेने हाती घेतले पाहिजे, असे एका जलतज्ज्ञाने सांगितले. याविषयी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, ‘या पाणवनस्पतीची समस्या काही महिन्यात सुटणार नाही. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे’, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
जलपर्णीचे मूळ एकाच ठिकाणी असते. त्या मुळाचा आधार व पाण्याचा आधार घेत जलपर्णी वाढते. जलपर्णी वाढण्यासाठी सांडपाणी महत्त्वाची भूमिका बजावते. ते मोहने, मोहिली परिसरातील नदीपात्रात आजूबाजूने वाहून येते. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात जलपर्णी आढळून येते.
– ललित सामंत, पर्यावरण विषयाचा अभ्यासक