डोंबिवली- रडतखडत सुरू असलेल्या आणि प्रवाशांना दररोज वाहन कोंडीने बेजार करत असलेल्या शीळफाटा रस्त्यावर ठेकेदाराने झाडांचे रोपण करून सुशोभिकरणाचा देखावा उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. झाडे लावताना रस्ता दुभाजकाच्या तळाशी डांबर, सिमेंटचे लगदे टाकून त्यावर लाल माती लोटण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे लावलेली झाडे पावसाळ्यात तरी जगतील का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
झाडे लावताना बुडाशी चांगली माती, खत टाकून त्याची लागवड केली जाते. शीळफाटा रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाडे लावताना ठेकेदाराने अजब शोध लावला आहे. पाऊस सुरू झाल्याने प्रवाशांकडून होणारी रस्ता नालस्ती कमी करण्यासाठी ठेकेदाराने रस्ता दुभाजकांमध्ये झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही झाडे लावताना दुभाजकामध्ये प्रथम खत, लावणाऱ्या झाडाला मुंग्या लागू नयेत म्हणून प्रतिबंधित पावडर आणि पावसाच्या नियमित सरी सुरू झाल्या की मग त्यामागे झाडे लावणे अपेक्षित असते, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
ठेकेदाराने झालेल्या रस्ते कामाच्या ठिकाणी रस्ता सुशोभित दिसण्यासाठी नवीन शक्कल लढविली आहे. रस्ता दुभाजकाच्या तळाशी केवळ माती टाकली तर ती अधिक प्रमाणात लागेल. झाडांच्या बुडाशी कमीत कमी माती लागावी आणि तेवढ्या खर्चाची बचत व्हावी म्हणून दुभाजकाच्या तळाशी, झाडांची रस्ते कामातून निघालेले टाकाऊ डांबरी, सिमेंटचे लगदे टाकले आहेत. या एक ते दोन फुटाच्या थरावर माती लोटून त्यावर झाडे लावण्याची अजब शक्कल लढविली आहे. दिवसाढवळ्या हे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. आपण खडकाळ भागावर झाडे लावत आहोत. आपले ‘नाटक’ प्रवासी, निसर्गप्रेमी पाहत याचेही भान ठेकेदाराला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्ते कामाची वाताहत ठेकेदाराने केल्याची सर्वदूर चर्चा आहे. आता झाडे लावताना झाडांना लावण्यापूर्वीच, मुळे धरण्यापूर्वीच मारण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू असल्याने पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.
दुभाजकांमध्ये झाडे लावली तर रस्ता सुशोभित दिसतो. रस्त्यावर सावली पडल्याने उन्हाचे चटके रस्त्यावर पडत नाहीत. त्यामुळे टायर घर्षण आणि अपघाताचे प्रमाण कमी होते. रात्रीच्या वेळेत समोरून येणाऱ्या दिव्याचा झोत चालकाच्या डोळ्यावर न पडता तो झाडांमुळे परावर्तित होऊन अपघात टळू शकतात, असे रस्ते वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ठेकेदाराच्या झाडे लावण्याच्या या झटपट कामाविषयी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
शीळफाटा रस्त्यावरील रस्ता दुभाजकांमध्ये झाडे लावताना ठेकेदाराकडून डांबर, सिमेंटचे तुकडे वापरून झाडे लावण्याचा देखावा उभा करण्यात येत आहे. प्रशासनाला सावध केले आहे. थातुरमातूर पध्दतीने झाडे लावण्यात येत असतील तर ही कामे थांबविण्यात यावीत, असे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी सांगितले.

शीळफाटा रस्त्यावर दुभाजकांमध्ये जमीन पृष्ठभागावर बुडाशी डांबर, सिमेंटचे लगदे टाकून त्यावर माती मग झाडे लावली जात असतील तर ही झाडे अधांतरी राहतील. मूळ धरणार नाहीत. पाणी झिरपणार नाही. आधार नसल्याने ती कोसळतील. शासनाचा पैसा, मेहनत फुकट जाईल. -मंगेश कोयंडे,उंबार्ली टेकडी संवर्धक,डोंबिवली

Story img Loader