रस्तोरस्ती पाणी भरलेल्या पिशव्या फेकण्यात येत असताना पालिकेला मात्र एकही पिशवी मिळेना
किशोर कोकणे, ठाणे</strong>
ठाणे शहरात धुळवडीच्या आधीच रस्तोरस्ती प्लास्टिकच्या पाणी भरलेल्या पिशव्या फेकण्यास सुरुवात झाली असली, तरी महापालिकेने राबवलेल्या मोहिमेत मात्र अशी एकही प्लास्टिक पिशवी आढळली नाही. त्यामुळे जांभळी नाका येथील बाजारात राबवलेली प्लास्टिकविरोधी मोहीम फोल ठरली आहे.
गेल्या काही वर्षांपासून धुळवडीत परस्परांवर पाणी फेकण्यासाठी फुग्यांऐवजी प्लास्टिकच्या छोटय़ा आणि पातळ पिशव्यांचा वापर केला जाऊ लागला आहे. या पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या असल्यामुळे त्यांच्यावर बंदी आहे. या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या पथकाने जांभळी नाका बाजारात मोहीम राबवली.
घाऊक आणि किरकोळ भाजी बाजारांमध्ये पातळ प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. होळी जवळ आल्यापासून शहरात रस्तोरस्ती पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकल्या जाऊ लागल्या आहेत. या पिशव्यांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळी नाका भागात दोन दिवसांपासून छापे घालण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी केलेल्या कारवाईत एकूण २०० फेरीवाले आणि दुकानांवर छापे टाकण्यात आले. त्यापैकी ५० दुकानदार आणि फेरीवाल्यांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या साध्या पिशव्या आढळल्या खऱ्या, मात्र धुळवडीत वापरली जाणारी एकही पिशवी आढळली नाही, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण विभागाने दिली.
दरम्यान, ठाण्याच्या बाजारात धुळवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुग्यांसोबत या पिशव्यांचीही सर्रास विक्री सुरू आहे. अवघ्या १० रुपयांत १०० पिशव्या मिळत आहेत.
दुकानदारांना ५ हजारांचा दंड
ज्या ५० दुकानदार आणि फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे, त्या प्रत्येक दुकानदाराकडून महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच त्यांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या कशा ओळखाव्यात, याची माहितीही देण्यात आली आहे.
प्लास्टिकच्या पिशव्यांसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. त्यामुळे धुळवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या आढळून आल्या नाहीत.
– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण विभागप्रमुख