वसई-विरार महापालिकेची कारवाई थंडावली; विक्रेत्यांकडून सर्रास वापर
पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंवर राज्य सरकारने बंदी घातली असतानाही वसई-विरारमध्ये शासनाच्या अध्यादेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांच्याकडून सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. महापालिकेनेही प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधातील कारवाई थांबवली असल्याने विक्रेते आणि खरेदी करणाऱ्यांचे फावले असून शहरात प्लास्टिकबंदीचा बोऱ्या उडाला आहे.
राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानंतर वसई-विरारच्या हॉटेल, फेरीवाले, किराणा माल दुकानदार यांच्याकडून सुरुवातीला त्याचे पालन करण्यात आले. महापालिकेनेही दंडात्मक कारवाई ठिकठिकाणी सुरू केली होती. मात्र पालिकेची कारवाई थंडावली आहे. शासनाकडून एक महिना सवलत असल्याने कारवाई थांबल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. मात्र जनजागृती सुरू असल्याचे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.
कारवाई होत नसल्याने वसई-विरारमध्ये प्लास्टिकबंदी कागदावरच राहिली आहे. अनेक दुकानदार, किरकोळ विक्रेते, फेरीवाले प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करत आहेत. दुकान, हॉटेल, बीअर शॉप, मटण, चिकन दुकाने, मासळी बाजार आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्या वापरू नका याबाबत महापालिकेतर्फे माहिती देण्यात आली होती, माहितीपत्रक वाटण्यात आले होते. अनेक दुकानांत प्लास्टिक पिशवी मागू नये, असे फलकही लावण्यात आले. परंतु आता कारवाईच थंडावली असल्याने प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कचराकुंडीत प्लास्टिक दिसत नव्हते, मात्र आता पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्याचा खच दिसू लागला आहे.
शासनाकडून प्लास्टिक वापरासाठी एक महिना सवलत मिळाल्याने कारवाई होणार नाही. त्यानंतर जो निर्णय येईल, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. आता तरी महापालिकेच्या हद्दीतील कारवाई थांबली आहे. परंतु पालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी जनजागृती चालू आहे.
सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका
ब्रेड, दूध, चटणी, भाजी किंवा अन्य खाद्यपदार्थ यांसाठी ग्राहकांची प्लास्टिक पिशव्यांची मागणी असते. ते घरातून डबे आणत नाहीत किंवा कापडी पिशव्या आणत नाहीत, तर थेट आमच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या मागत असल्यामुळे आम्हाला ग्राहकांची मागणी पूर्ण करावी लागते. जर प्लास्टिकच्या पिशव्याच बंद झाल्या, तर या वस्तू देणार तरी कशा हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे.
– राहुल जैन, दुकानदार
ग्राहकांना जनजागृती करण्यासाठी अवधी मिळाला असून आमच्याकडे असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या लवकरच संपवून ग्राहकांना कागदी किंवा कापडी पिशव्या घेऊन येण्याचे आवाहन करणार आहोत. त्यामुळे लवकरच वसई प्लास्टिकमुक्त करणे सोपे होईल. खाद्यपदार्थ देताना आम्ही आतापासूनच कागदी पिशव्यांचा वापर करत आहोत.
– रोहित राऊत, हॉटेल मालक
कधी कधी घरातून निघताना कापडी पिशवी घेऊन जाण्याचा विसर पडतो. त्या वेळी वस्तू खरेदी करताना प्लास्टिकच्या पिशव्या मिळाल्या नाही तर आम्ही त्या कशा नेणार? प्लास्टिकबंदी केल्याने दैनंदिन वस्तू घरी नेताना गैरसोय निर्माण होत आहे. प्लास्टिकवर बंदी आणताना त्याचे निकष आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्याप्रकारेच बंदी आणावी.
– सायली राणे, रहिवासी