प्रसेनजीत इंगळे (विरार)
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्लास्टिकची अंडी मिळत असल्याची अफवा पसरली आहे. कांदिवलीमधील चारकोप भागात अशी अंडी मिळत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता वसईतही बाजारात प्लास्टिकची अंडी मिळत असल्याची अफवा पसरली आहे. वसईत अनेक ठिकाणी प्लास्टिकची अंडी मिळत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
विरार मधील नाना नानी पार्क, गुरुदत्त नगर, बोलींज, नालासोपारा, आचोळ, समेळपाडा, वसई गिरिज या ठिकाणी असे प्रकार आढळून आले आहेत. लोक दुकानात जाऊन चक्क अंडी फोडून पाहत आहेत. तसंच त्याचे व्हिडीओ बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे. समेळ पाड्यात एका अंडे विक्रेत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
अनेक लोक अंडे फोडून त्याचा पापुद्रा जाळून पाहत आहेत. सोशल मिडियावर सध्या हा विषय जलदगतीने पसरत आहे. यामुळे अंडी विक्रेते चांगलेच अडचणीत आले आहेत. नागरिकांचा रोष ओढवू नये म्हणून विक्रेते चक्क दुकानात अंडी मिळत नसल्याचं सांगत आहेत.
ही अंडी नेमकी प्लास्टिकची आहेत की नाही याची कोणतीही तपासणी केली जात नाही आहे. पण अन्न व औषध प्रशासन विभागाने यासंदर्भात माहिती देताना, प्लास्टिकची अंडी नसतात, ही केवळ अफवा असल्याचं सांगितलं आहे. “प्लास्टिकचं अंडे तयार केलं जाऊ शकत नाही. अनेक ठिकाणी अंड्यांची तपासणी केली. आम्हाला यामध्ये काहीही आढळलं नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं आवाहन अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त प्रकाश वाघमारे यांनी सांगितले.