कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण मधील सभेसाठी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आले होते. कडक उन्हामुळे सतत तहान लागत असल्याने प्रत्येक नागरिक, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या हातात पाण्याची बाटली होती. पण ही पाण्याची बाटली सुरक्षेच्या कारणास्तव सभा मंडपात नेण्यास नागरिकांना पोलिसांकडून मज्जाव केला जात होता. अशा सर्व बाटल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यावर फेकून देण्यात येत होत्या. सभा संपल्यानंतर या पाण्याने भरलेल्या, रिकाम्या बाटल्यांचा खच वेचण्यासाठी कचरा वेचकांची झुंबड उडाली होती.
शहरात फिरून दिवसभरात एक पोते प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरत असताना मोदींच्या बुधवारच्या सभेने कचरा वेचकांना सभा स्थळी एकाच जागी तीन ते चार पोती (गोणी) प्लास्टिकच्या बाटल्या मिळाल्या. या बाटल्या गोणीत भरताना कचरा वेचक पती, पत्नी, त्यांची मुले आनंदित होती. मुख्य प्रवेशद्वारावर पडलेला पाण्याच्या बाटल्यांचा खच कसा काढायचा असा प्रश्न सुरक्षा व्यवस्थेवर होता. परंतु, त्यांचे हे काम कचरा वेचकांनी तात्काळ पार पडले.
आणखी वाचा-मोदींच्या कल्याणमधील सभेसाठी मुरबाड भागात बस न पाठविल्याने कथोरे समर्थक नाराज
मोदींच्या सभेसाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, भिवंडी, वाडा परिसर, ठाणे जिल्ह्यातून शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातून नागरिक बस, टेम्पो, इतर खासगी वाहनांनी आले होते. कडक ऊन, अंगाच्या काहिलीने नागरिक सततच्या तहानेने व्याकुळ होत होते. शरीरात पाण्याची कमतरता नको म्हणून आयोजकांनी प्रत्येक नागरिक, कायकर्त्याच्या हातात एक पिण्याची प्लास्टिकची बाटली दिली होती.
या बाटल्या हातात घेऊन नागरिक, कार्यकर्ते सभा स्थानी दाखल होत होते. अशा दाखल होणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशव्दारावर सुरक्षेच्या कारणास्तव तपासून मग सभा मंडपात सोडले जात होते. यावेळी नागरिकांच्या हातामधील पाण्याची बाटली मुख्य प्रवेशव्दाराच्या कोपऱ्यावर सुरक्षा तपासणीच्या वेळी काढून टाकण्यास सांगण्यात येत होती.
नागरिकांनी अशाप्रकारे शेकडो बाटल्या सभा प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यावर फेकल्या होत्या. बाटल्या बाहेर टाकल्या शिवाय कोणालाही सभा मंडपात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे नागरिक हातामधील पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर फेकून मंडपात प्रवेश करत होते. सभा मंडपात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. सभा संपल्यानंतर नागरिकांची पायावर पाय देत सभा मंडपाबाहेर पडण्याची घाई सुरू असताना, सभा मंडपाच्या मुख्य प्रवेशव्दारावर मात्र कचरा वेचकांची गोणी घेऊन प्लास्टिक बाटल्यांचा पडलेला खच वेचण्यासाठी झुंबड उडाली होती.
आणखी वाचा-…आणि नाईक आनंदाश्रमात फिरकलेच नाहीत
निवडणूक आहे की नाही याचे भान आपल्या उपजीविकेच्या काळजीने नसलेल्या कचरा वेचकांना कल्याणमध्ये नरेंद्र मोदी कशासाठी आले होते, हे समजले नसले तरी मात्र एक दिवसात मोदींच्या सभेमुळे आपणास एकाच जागी तीन ते चार गोणी प्लास्टिकच्या बाटल्या मात्र मिळाल्या, याचा आनंद कचरा वेचक कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. लोकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे तेथे प्लास्टिकचे कप, बाटल्या मिळतील हे माहिती होते. त्यामुळे आम्ही मुख्य रस्त्यावर आम्हाला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बाटल्या वेचण्यासाठी कधी प्रवेश मिळतो याची वाट पाहत होतो. सभा संपल्यानंतर ती संधी मिळाली, असे कचरा वेचक दिव्या रमण्णा या महिलेने सांगितले.