बदलापूरः बदलापूर रेल्वे स्थानकात उदवाहिका, स्वयंचलित जीने आणि पादचारी पुलाची उभारणी करण्यासाठी फलाट क्रमांक एक आणि दोन काही काळासाठी बंद केले जाणार आहेत. त्यामुळे नव्याने उभारण्यात येणाऱ्या होम प्लॅटफॉर्मवरून बदलापुरवरून सुटणाऱ्या लोकल पकडाव्या लागणार आहेत. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या स्थानकातील सुविधा अपुऱ्या पडत असताना या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल वाढणार आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. मात्र भौगोलिक कारण देत रेल्वे प्रशासनाने कायमच येथे सुविधा देण्याकडे कानाडोळा केला. २०१९ मध्ये घाईघाईन होम प्लॅटफॉर्मच्या उभारणीचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र आजतागायत त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मात्र त्याच्या पुर्णत्वापूर्वीच रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक आणि दोन बंद करून येथे स्वयंचलित जीने आणि उदवाहिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी फलाट क्रमांक एक आणि दोनवर संरक्षित जाळी लावली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही फलटावरचा भाग होम प्लॅटफॉर्मवर पडणार आहे. बदलापूर रेल्वे स्थानक व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार फलाट क्रमांक एक आणि दोन वर स्वयंचलित जिने आणि उद्वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या फलाट क्रमांक एक आणि दोनवर जाळी लावली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बदलापूर स्थानकातील नव्याने उभारण्यात आलेल्या होम प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडावी लागणार आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या होम प्लॅटफॉर्मवर गर्दी होण्याची भीती व्यक्त होते आहे. फलट क्रमांक एक आणि दोन वाहतुकीसाठी बंद झाल्याने बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या, बदलापुर आणि कर्जत तसेच खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्याही होम प्लॅटफॉर्मवरूनच जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत रेल्वे प्रशासनाने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून संविधान अभावी हाल सोसणाऱ्या बदलापूर आणि आसपासच्या रेल्वे प्रवाशांच्या त्रासात या कामामुळे भर पडणार आहे.
हेही वाचा >>>देशातील हुकूमशाही उलथविण्यासाठी सज्ज रहा; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डोंबिवलीत लावलेल्या फलकांमुळे खळबळ
फेरा वाढणार
होम प्लॅटफॉर्मवर बदलापूर पश्चिमेकडे जाण्यासाठी सोपे आहे. मात्र पूर्वेकडील प्रवाशांना कल्याण दिशेच्या आणि कर्जत दिशेच्या पादचारी पुलांचा वापर करावा लागणार आहे. त्यात रेल्वे प्रशासन जुन्या पादचारी पुलाला पाडून नव्याने पादचारी पुल उभारणार आहे. बदलापूर स्थानकात डेक उभारून त्यावर रेल्वेचे कार्यालय स्थलांतरित केली जाण्याची शक्यता आहे. मात्र या काळात जुना पादचारी पुल पाडल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडणार आहे.
प्रतिक्रिया: पादचारी पुल, स्वयंचलित जिने आणि उद्वाहन उभारणीसाठी अरुंद फलाट क्रमांक एक आणि दोनवर काम केले जाणार आहे. मात्र होम प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना त्रास होणार नाही. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.