फलाटांची उंची वाढवण्यास सुरुवात; अन्य स्थानकांवरही लवकरच कामे

गाडीतून उतरताना गाडी आणि फलाटातील अंतराकडे लक्ष द्या अशा उद्घोषणा रेल्वेमध्ये वारंवार केल्या जातात. मात्र मुंब्रा स्थानकामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही चिंता आता लवकरच मिटणार आहे. गेल्या आठवडय़ापासून मुंब्रा स्थानकाच्या सर्वच फलाटांची उंची वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. फलाट आणि गाडीमधील अंतरामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या भविष्यकाळात कमी होणार आहे.

गाडी आणि फलाट यामध्ये असलेल्या अंतरामुळे गर्दीच्या वेळी गाडी पकडताना प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. फलाटांची उंची कमी असल्याने गर्दीच्या वेळेत स्थानकांमध्ये प्रवाशांचे पाय अडकून झालेल्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांमार्फत फलाटांची उंची वाढवण्यासाठी वारंवार केल्या जाणाऱ्या मागण्यांची दखल घेऊन अखेर मुंब्रा स्थानकातील फलाटांची उंची वाढवण्याचे काम सुरू केले आहे.

सकाळच्या वेळी मुंब्रा स्थानकातून अनेक प्रवासी गाडय़ांमध्ये चढतात. गाडीमध्ये चढणाऱ्या एकूण प्रवाशांच्या तुलनेत खूपच कमी वेळ गाडी थांबते. त्यामुळे गाडी स्थानकावर येताच गाडी पकडण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच झुंबड उडते. अशा गडबडीत फलाट आणि गाडीतील अंतराकडे प्रवाशांचे लक्ष जात नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते.  या पाश्र्वभूमीवर फलाटांची उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

सध्या मुंब्रा स्थानकात फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. लवकरच ठाणे पलीकडच्या कळवा, कल्याण आदी स्थानकांमध्येही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फलाटाची उंची वाढविण्यात येणार आहे. 

ए.के.सिंह, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.