कल्याण पूर्वेतील नेतिवली ते मलंग गड १०० फुटी रुंद रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या वर्दळीच्या रस्त्यावर दररोज सकाळी, संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होते.
कल्याण पूर्वेतील नेतिवली ते मलंगगड हा वाहन वर्दळीचा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याने कल्याण, उल्हासनगरमधील बहुतांशी वाहने नेवाळी चौक मार्गे बदलापूर, कर्जत, काटई, खोणी मार्गे तळोजा, मुंबई, ठाणे, नवी मुंबई दिशेने जातात. त्याच मार्गाने वाहने शहरात येतात. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे पालिकेकडून बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे हे खड्डे मोठया आकाराचे झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी तुंबले असल्याने अनेक वेळा खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यांमध्ये आपटून अपघात होत आहेत.
मलंग गड रस्त्यावर महाविद्यालय, शाळा आहेत. अनेक शिक्षक, विद्यार्थी दुचाकी, सायकलने महाविद्यालय, शाळेत येतात. त्यांना खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. या भागातील अनेक जागरूक रहिवाशांनी, व्यापाऱ्यांनी दुकानांसमोरील खड्डे बुजविण्याची कामे केली. ही कामे तात्पुरती असल्याने ते खड्डे पुन्हा उखडले आहेत. या रस्त्यावर चेतना विद्यालय ते आरटीओ नाका पर्यंत सकाळ, संध्याकाळ रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांचा बाजार भरतो. फेरीवाले पदपथ, रस्त्याच्या दोन्ही बाजू अडून व्यवसाय करतात. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहत नाहीत. दुकानांसमोर दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. हा बाजार बंद करावा म्हणून गेल्या दोन दिवसापूर्वी या भागातील रहिवाशांनी आंदोलन केले होते.
मलंग रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक वाहनांची येजा करण्यासाठी फोडून ठेवण्यात आले आहेत. या फोडलेल्या दुभाजकांमधून अनेक दुचाकी, चारचाकी वाहन चालक वळण घेऊन वाहन कोंडीत भर घालत आहेत. दररोज संध्याकाळी सहा नंतर रात्री उशिरापर्यंत खड्ड्यांमुळे मलंग गड रस्त्यावर वाहन कोंडी असते. मलंग गडावर गेलेले भाविक या कोंडीत अडकून पडतात. आठवड्यातून खड्ड्यात दुचाकी आपटून दुचाकी स्वार जखमी झाल्याच्या घटना या भागात घडतात, असे या भागातील दुकानदार श्रीमणी यादव यांनी सांगितले.
पालिकेने खड्डे भरणीची कामे जोमाने सुरू केली असल्याचा दावा केला जात असला तरी कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील खड्डे का भरले जात नाहीत, असा प्रश्न रहिवासी करत आहेत. या रस्त्याचा नेवाळी दिशेकडील भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. हा विभागही खड्ड्यांकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पालिकेने १० प्रभागांमध्ये खड्डे भरणी कामासाठी ठेकेदार नियुक्त केल्याचा दावा केला असला तरी डोंबिवली, कल्याण, टिटवाळा भागातील खड्डे अद्याप कायम आहेत.
पालिकेच्या शहर अभियंता विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे खड्डे भरणीची कामे वेगाने होणे शक्य नसल्याने शहरातील अनेक सामाजिक संस्था, रिक्षा चालक स्वताहून पुढे येऊन खड्डे भरणीची कामे करत आहेत. वाहतूक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांना शिळफाटा रस्त्यावरील कोंडी बरोबर मलंगगड, नेतिवला, टाटा नाका भागातील वाहतूक नियोजनावर लक्ष ठेवावे लागते.