ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिला सशक्तीकरण कार्यक्रम तसेच विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन, उद्घाटन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने परिवहन सेवेच्या टीएमटी बसगाड्या सभेसाठी वळविल्या आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सॅटीस पूलावर टीएमटी बसगाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी सांयकाळी ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प, छेडा नगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन आणि उद्घाटन, महिला लाभार्थी सशक्तीकरण अभियानास उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी हे सांयकाळी सभास्थळी पोहचणार असले सकाळी ११ वाजेपासूनच लाभार्थी महिला, सभेसाठी जाणाऱ्या नागरिकांना बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी परिवहन सेवेच्या बसागाड्या वळविण्यात आल्या आहेत. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुक टीएमटी बसगाडीवर अवलंबून आहे. मोदी यांच्या सभेसाठी ठाणे महापालिकेने दोनशे बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील प्रवाशांचा भार उर्वरित १४० बसगाड्यांवर अवलंबून असणार आहे. शनिवारी त्याचा परिणाम दिसून आला.
हेही वाचा >>>महिला सशक्तीकरण अभियानास उपस्थिती
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात कारखाने, काॅल सेंटर आहेत. या ठिकाणी कल्याण डोंबिवली तसेच विविध भागातून येणारे नागरिक बसगाड्यांनी वागळे इस्टेट भागात जात असतात. शहरातील बसथांब्यावरही प्रवासी बसगाड्यांच्या प्रतिक्षेत दिसून आले. परंतु या प्रवाशांना वेळेत बसागाड्या उपलब्ध झाल्या नाहीत. सॅटीस पूलावर प्रवाशांंच्या रांगा दिसून येत आहे. प्रशासनाच्या कारभावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. ‘मोदी यांच्या कार्यक्रमासाठी मिंध्यांनी ठाणेकरांचे हाल केले. टीएमटीच्या बसगाड्या कार्यक्रमासाठी वळविल्याने सर्वसामान्य ठाणेकरांचे हाल.. प्रवाशांच्या रांगा, आतातरी जागे होईल का ठाणेकर? स्वार्थी राजकारणी तुम्हाला गृहीत धरतात’ अशी प्रतिक्रिया त्यांनी एक्स या समाजमाध्यमावरून केली.