ठाणे – येथील खोपट भागातील महापालिका शाळेचा क्रीडा महोत्सव जांभळी नाका येथील शिवाजी मैदानावर सुरु आहे. परंतु, याठिकाणी विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यासाठी योग्य अशी सुविधा निर्माण करून देण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. या मैदानावर मोठ्याप्रमाणात खडी पसरल्या असून त्या खडीवर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा होत आहेत. यामुळे ही खडी विद्यार्थ्यांच्या पायात रुतत असून त्यांना दुखापत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डिसेंबर – जानेवारी हा कालावधी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवडता असतो. कारण, या काळात शाळा-महाविद्यालयांमध्ये क्रीडा महोत्सव, वार्षिक महोत्सव असे विविध कार्यक्रम होत असतात. ठाणे शहरातील बहुतांश खासगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये सध्या क्रीडा महोत्सव सुरु आहे. पालिका शाळांचे गट स्तरांवर या स्पर्धा पार पडत असतात. क्रीडा महोत्सवासवाच्या दोन ते तीन दिवस आधीपासून शाळा व्यवस्थापकांकडून मैदानाची स्वच्छता, मैदानावर पाणी मारणे, लाल माती पसरवण्याची कामे केली जातात. विद्यार्थ्यांना खेळताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते.
ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या खोपट भागातील काही शाळांचा क्रीडा महोत्सव हा जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सुरु आहे. १९ आणि २० डिसेंबर असे दोन दिवस हा क्रीडा महोत्सव येथे पार पडणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा या मैदानात होत आहेत. यामध्ये बास्केटमध्ये बॉल टाकणे, चमचा लिंबू, धावणे, रिल रेस, लांब उडी, थाळी फेक, गोळा फेक या वैयक्तिक स्पर्धांसह लंगडी, कबड्डी, खो- खो आणि क्रिकेट हे सांघिक सामने पार पडणार आहेत. परंतु, या मैदानात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी योग्य सुविधा नसल्याचे दिसून येत आहे. मैदानाची योग्यरित्या सफाई झाली नसून त्यावर खडी पसरलेली आहे. त्यावरच हे विद्यार्थी सकाळपासून खेळत असल्याचे दिसून येते. दुपारचे ऊन आणि त्यात मैदान साफ नसल्यामुळे खेळताना विद्यार्थ्यांच्या पायात खडी रुतत असल्याचे निदर्शनास आले. याचा नाहक त्रास विद्यार्थांना सोसावा लागत आहे. या मैदानात कोणते राजकीय किंवा इतर कोणते कार्यक्रम असल्यास पालिका प्रशासनामार्फत मैदानाची योग्यरित्या स्वच्छता करण्यात येते. परंतु, विद्यार्थ्यांचे खेळ याठिकाणी होणार आहेत, हे माहित असतानाही कोणत्याही प्रकारची दक्षता याठिकाणी बाळगण्यात आली नसल्याचे दिसून येते.
हेही वाचा – राममंदिर अक्षत कलश यात्रेनंतर ठाण्यातील ८ लाख घरांत संपर्क साधणार
क्रीडा महोत्सवासाठी मैदान साफ करण्यात आले होते. परंतु, मैदानाच्या मधल्या भागात काही ठिकाणी खडी होती. आम्ही खडीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे खेळ घेत नव्हतो. दरवर्षी क्रीडा महोत्सवासाठी जे मैदान घेतो, ते ऐन वेळी आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे हे मैदान आम्ही दोन दिवसांपूर्वी निश्चित केले. त्यामुळे याठिकाणी पुरेशी तयारी करता आली नाही. – प्रेरणा कदम, गटप्रमुख, खोपट, ठाणे महापालिका शिक्षण विभाग