डोंबिवली : गेल्या काही महिन्यांपासन डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चार वर कल्याण बाजूकडे फलाटावर छत नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत होती. पाऊस सुरू झाल्यापासून प्रवाशांना घोळका करून एका भागात उभे राहावे लागत होते. लोकल आली की धावत जाऊन डब्यात चढावे लागत होते. याविषयी प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने रेल्वे प्रशासनाने फलाटावर छत टाकण्याचे काम सुरू केले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण बाजुच्या दिशेने ६० ते ७० फूट परिसरात फलाटावर छत टाकण्याचे काम अपूर्ण होते. हे काम करण्यासाठी रेल्वेला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. फलाटावर छत नसल्याने उन्हाळ्यात प्रवासी जिना, स्कायवाॅकचा आडोसा घेऊन उभे राहत होते. पाऊस सुरू झाल्यापासून चारही बाजुने गळती होत असल्याने प्रवाशांना लोकल येईपर्यंत फलाटा वरील छत असलेल्या भागात घोळका करून उभे राहावे लागत होते. यामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत होती.
लोकल आल्यानंतर पाऊस सुरू असताना धावत जाऊन लोकल पकडावी लागत होती. या गडबडीत प्रवासी पाय घसरून पडण्याची शक्यता होती. फलाट क्रमांक चारवर कल्याणकडे जाणारी लोकल आली, त्यावेळी पाऊस सुरू असेल तर प्रवाशांना पावसात भिजत लोकल मधून उतरावे लागत होते. उतरणारे, चढणारे प्रवासी अशी झुंबड भर पावसात उडत होती. छत नसल्याने हा गोंधळ उडत असल्याने जागरुक रेल्वे प्रवाशांनी स्थानिक स्थानक व्यवस्थापक, मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे याविषयी तक्रारी केल्या होत्या. छत नसल्याच्या तक्रारी वाढत गेल्यानंतर मंगळवारी दुपार पासून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चारवर कल्याण बाजूकडे छत नसलेल्या भागात छत टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.