कळवा येथील सार्वजनिक रुग्णालयाचा पांढरा हत्ती पोसताना अक्षरश: घायकुतीला आलेल्या ठाणे महापालिकेने शहरातील इतर भागांत लहान रुग्णालये उभारता येतील का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेच्या विकास आराखडय़ात आरोग्यविषयक वापराच्या भूखंडांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार राखीव भूखंडांची माहिती एकत्रित करण्याचे आदेश नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधितांना दिले आहे. यापूर्वी खासगीकरणातून रुग्णालये उभारण्याचे महापालिकेचे धोरण वादग्रस्त ठरले असताना आयुक्तांनी नव्याने सुरू केलेल्या चाचपणीविषयी महापालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला आहे.
या राखीव भूखंडावर नागरिकांना पायाभूत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालये उभारण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. यामुळे भविष्यात राखीव भूखंडावर रुग्णालये उभी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. याशिवाय २५ आरोग्य केंद्रे आणि पाच प्रसूतिगृहे आहेत.
कळवा रुग्णालयात ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील रुग्णही उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावर भार मोठा आहे. कळवा रुग्णालयाचा आवाका लक्षात घेता हे रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मध्यंतरी आयुक्त असीम गुप्ता यांनी आखला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्रिपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती होताच गुप्ता यांनी आखलेल्या या प्रस्तावामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या गोटातून तीव्र स्वरूपाचा विरोध झाला होता. या पाश्र्वभूमीवर शहरात खासगी सहभागातून रुग्णालयांची उभारणी करण्याचा प्रस्ताव गुप्ता यांनी आखला.
हा प्रस्ताव म्हणजे मोठय़ा रुग्णालयांना ठाण्यातील मोक्याचे भूखंड आंदण करण्याचा प्रकार असल्याची टीका करण्यात आली होती. त्यामुळे गुप्ता यांचा हा प्रस्ताव सद्य:स्थितीत तहकूब करण्यात आला आहे.

राखीव भूखंडाचा शोध सुरू
लोकसंख्येच्या मानाने कळवा रुग्णालयातील आरोग्य सुविधेवर ताण वाढला आहे. यामुळे घोडबंदर तसेच कौसा भागात नवे रुग्णालये उभारण्याचे काम सुरू आहे. कौसा भागातील रुग्णालयावर झालेल्या वाढीव खर्चामुळे हा प्रस्ताव वादग्रस्त ठरला असला तरी येथील निकड लक्षात घेऊन रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने सुरू ठेवण्याचा महापालिकेचा मानस आहे. महापालिकेने शहरातील अन्य भागांतही रुग्णालये उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीराखीव भूखंडाचा शोध सुरू केला आहे, मात्र शहरात आरोग्य सुविधेकरिता राखीव भूखंडाची माहिती शहर विकास विभागाकडून त्यांना अद्याप प्राप्त झालेली नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

निधी संकलन पर्यायांचा शोध
महापालिकेचे नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे शहरात आरोग्य केंद्रासाठी राखीव असलेल्या भूखंडाची सविस्तर माहिती गोळा करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. या भूखंडाची यादी प्राप्त होताच तेथे रुग्णालये उभारता येतील का आणि त्यासाठी निधी कसा उपलब्ध होईल, याचा सविस्तर विचार करून रुग्णालयांचे प्रस्ताव सादर करण्यात येतील, असेही त्यांनी  स्पष्ट केले.

Story img Loader