ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी ठाण्यात येणार आहे. प्रशासनाकडून त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू असताना दुसरीकडे महायुतीच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी मोदी यांच्या स्वागतासाठी फलकबाजी करून घोडबंदरचे विद्रुपीकरण केले आहे. माजिवडा ते घोडबंदर येथील कासारवडवली पर्यंत मेट्रोचे खांब, दुभाजक, पदपथांवर फलकबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई मार्गाने ठाण्यात दाखल होणार आहे. असे महामार्ग, मुख्य मार्गांवर फलकबाजी का करण्यात आले असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लाभार्थी सन्मान सोहळा हा कार्यक्रम घोडबंदर येथील बोरीवडे भागात पार पडणार आहे. मागील चार दिवसांपासून महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलासह विविध यंत्रणांकडून या कार्यक्रमाचे नियोजन सुूरू आहे. मोदी हे हवाई मार्गाने सभास्थळी येणार असल्याने मैदान परिसरात हेलिपॅडही तयार करण्यात आले आहे. असे असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक घोडबंदरच्या रस्त्यावर झळकू लागले आहेत. ठाणे शहरातील मुख्य मार्ग, घोडबंदर मार्गावर त्यांच्या स्वागताचे फलक बसविण्यास सुरूवात केली आहे. घोडबंदर मार्गावरील माजिवडा ते कासारवडवली येथील बोरीवडी मैदानापर्यंत फलकबाजी करण्यात आली आहे.

हे ही वाचा…भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा इशारा; विधानसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

घोडबंदर भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीएकडून) वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रोच्या मार्गिकांसाठी घोडबंदर मार्गाकडेला मेट्रोचे खांब उभारण्यात आले आहेत. या खांबावर कोणतीही जाहिरात करण्यास मनाई असते. असे असतानाही खांबावर मोदी यांच्या स्वागताचे फलक उभारण्यात आले आहेत. या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे छायाचित्र आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत’ असा मजकूर या फलकांवर आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री, आमदार आणि खासदारांची छायाचित्र या फलकांवर आहेत. काही ठिकाणी बांबूचा आधार घेत मुख्य मार्गाचा काही भाग व्यापून, रस्त्यालगतच्या विद्युत दिव्यांचा आधार घेत देखील फलक आणि पक्षांचे झेंडे लागले आहेत. तसेच मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ येथील उड्डाणपूलांवरील दुभाजकांवर फलकबाजी करण्यात आली आहे.

मेट्रोच्या खांबा व्यतिरिक्त पदपथही या फलकांनी गिळंकृत केले आहेत. कासारवडवली ते बोरीवडी मैदानापर्यंत पदपथ, गृहसंकुलांचे प्रवेशद्वारालगत फलक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पदपथांवरून चालणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे.

हे ही वाचा…नशिले शहर !

मोदी यांच्या सभेपूर्वी मैदानापासून काही मीटर अंतरावरील दुकानदारांना शनिवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने तोंडी दिले आहेत. त्यामुळे शनिवारी येथील रहिवाशांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi visit thane on saturday mahayutti office bearers defaced ghodbunder with placards sud 02