ठाणे : राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना रोखण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. अहंकारापोटी मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प तसेच दुष्काळी भागात पाणीपुरवठ्याचे प्रकल्पही रोखले. अशा महाविकासविरोधी आणि विकासशत्रू असलेल्या महाविकास आघाडीला रोखण्याचे काम तुम्ही करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केले.
काँग्रेस पक्ष हा लूट, भ्रष्टाचार आणि कुशासनचे ‘पॅकेज’ असल्याची टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सूड उगवण्याचे काम करेल आणि राज्याचा विकास रोखेल असे सांगताना राज्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महायुतीच्या सरकारला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
घोडबंदर येथील कासारवडवली भागातील वालावलकर मैदानात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडला. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस लक्ष्य
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि विशेष करून काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. राज्यात महायुतीचे सरकार विकसित राज्याचे ध्येय ठेवून काम करीत आहे. एकीकडे ही विकासकामे करत असताना काँग्रेसच्या काळात झालेल्या खड्डे भरणीची दुहेरी मेहनत आम्हाला करावी लागत आहे. महाराष्ट्रात इतकी वर्षे काँग्रेस पक्ष सत्तेत होता, या काळात काँग्रेसने मुंबई, ठाण्यासाठी काय केले, असा सवाल मोदी यांनी या वेळी केला.
पायाभूत प्रकल्पांचे जाळे
आमच्या सरकारने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे विणले, सागरी किनारी मार्ग, अटल सेतू असे मार्ग निर्माण केले. राज्याच्या विकासासाठी ध्येय ठेवून महायुतीचे सरकार काम करत आहे. परंतु महाविकास आघाडीच्या लोकांकडून ही कामे रोखण्यात आली. मुंबई मेट्रो ३ हे त्याचे उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या मेट्रो प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले होते. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी काम थांबवले. यामुळे प्रकल्प किमतीत १४ हजार कोटींची वाढ झाली.
काँग्रेसकडून शौचालयावर कर
आम्ही सर्वत्र शौचालय उभारणीवर लक्ष देत आहोत. मात्र काँग्रेस त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये शौचालयांवरती कर लावत आहे. काँग्रेस पक्ष निवडणुकीत मोठ मोठ्या घोषणा करते पण निवडणुका झाल्यानंतर लोकांचे शोषण कसे करता येईल यावर काम करते, असा आरोपही त्यांनी केला.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र या योजना कशा बंद करता येतील याची संधी महाविकास आघाडी शोधत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी दोन हजाराहून अधिक वाहनांमधून नागरिक कार्यक्रमस्थळी आले होते. या कार्यक्रमाला जवळपास १ लाख नागरिक उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत आहे.
फडणवीस यांची टीका
मेट्रो तीन हा प्रकल्प कोणाच्या तरी गर्वाचे मर्दन करणारा आणि हरण करणारा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
अभिजात दर्जा हा मराठीसाठी सुवर्णक्षण
मुंबई: मराठीमुळे देशाची सांस्कृतिक विविधता अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे या भाषेचा अभिजात भाषा म्हणून करण्यात आलेला सन्मान हा संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त केलेला मानाचा मुजरा आहे. आजचा हा दिवस मराठीसाठी सुवर्णक्षण असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे काढले. सत्ताबाजार