मालमत्ता कर थकविल्याने कडोंमपाकडून कारवाई
कल्याण येथील वायलेनगर भागातील पोद्दार इंटरनॅशनल शाळेने सुमारे तीन कोटी ३६ लाखांचा मालमत्ता कर थकविला आहे. या कारणावरून महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी शाळेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकांच्या दालनासह अन्य विभागांची कार्यालये सील करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा मालमत्ता कर पोद्दार इंटरनॅशनल शाळेने २००९ पासून थकविला असून या कराचा आकडा दोन कोटी ४३ लाख ४६ हजार २८२ रुपये इतका आहे. गेल्या सहा वर्षांत या रकमेवर लावण्यात आलेल्या व्याजाचा आकडा ४५ लाख ७१ हजार ९४ रुपये इतका आहे. तसेच यंदाच्या वर्षांतील कराची रक्कम ४७ लाख १८ हजार ९५६ रुपये इतकी आहे. अशी एकूण तीन कोटी ३६ लाख ३६ हजार ३३२ रुपये इतका मालमत्ता कर शाळा प्रशासनाने थकविला आहे.
मालमत्ता कराची रक्कम भरण्यासाठी महापालिकेने शाळा प्रशासनाला अनेकदा नोटीस बजावल्या आहेत, मात्र शाळा प्रशासनाने त्याला केराची टोपली दाखविली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने शाळा प्रशासनाला नुकतेच एक पत्र पाठविले होते. त्यामध्ये मालमत्ता कर तातडीने भरण्याची सूचना दिल्या होत्या. तसेच कर भरला नाहीतर शाळेची मालमत्ता सील करण्यात येईल आणि त्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. या पत्रास शाळा प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. अखेर महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशानुसार ‘ब’ प्रभाग कर अधीक्षक स्वाती गरूड यांच्या पथकाने शाळेवर कारवाई केली. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचे कार्यालय, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचे कार्यालय आणि कर्मचारी कक्षाच्या दोन खोल्यांना सील करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा