भार वाढला तरी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, अशी व्यवस्था उभी करा ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. असे असताना काही आठवडय़ांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये वीज खंडीत होत आहे.

काळ वेळ नाही

उकाडय़ाने कासावीस होतो. वीज खंडीत होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. वीज जाण्याच्या प्रक्रियेला काळवेळ नाही. इन्व्हर्टर असला तरी तोही चार्ज होण्यासाठी वीज लागते. महावितरण कार्यालयात फोन केल्यास व्यवस्थित उत्तरेही दिली जात नाहीत.
व्हीपाली पदे, कल्याण

त्रास कायमचाच
ठाणे शहरात वारंवार विजेचा पुरवठा खंडीत होणे हे खरे तर येथील व्यवस्थेला भूषणावह नाही. महावितरण विभागाकडे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. या सर्व प्रकाराचा सर्वाधिक त्रास हा घरातील वृद्ध आणि लहान मुलांना होतो. कर्मचारीवर्ग सतत कामानिमित्त बाहेर असल्यामुळे किंवा कार्यालयात असल्याने त्यांना फार याचा त्रास जाणवत नाही.
अतुल पवार, ठाणे

कामाचा खोळंबा
ठाणे शहरात सततच्या विजेच्या गोंधळामुळे येथील व्यवसाय व कार्यालयांना फटका बसतो. नौपाडा तसेच आसपासच्या परिसरातील वीजपुरवठय़ाचे नियोजन अत्यंत ढिसाळ असून महावितरणचा कारभार व्यापाऱ्यांना नकोसा झाला आहे. आठवडातील सातही दिवस थोडय़ा फार वेळेसाठी का होईना वीजपुरवठा बंद असतो. विजेचा हा सावळा गोंधळ कधी संपणार असा प्रश्न पडतो.
– गणेश आंब्रे, ठाणे

पावसाळ्याआधी सावरा
मे, जूनमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा सुरू असतात. ऐन परीक्षांच्या काळात वीज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे होत असतात. त्यामुळे देखभाल दुरुस्ती होते नेमकी कशाची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.
स्मिता आठवले, कल्याण</strong>

समन्वयाचा अभाव
घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा वापर करता येत नाही. गरजेच्या वेळी वीज नसल्याने अनेक दैनंदिन कामे रखडतात. पूर्वी वीज बंद करण्यापूर्वी पूर्वकल्पना दिली जात होती. अलीकडे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज बंद केली जाते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. अवेळी तासन्तास वीज बंद होत असली तरी बिल मात्र काही कमी होत नाही.
कृष्णा परब, ठाणे

महावितरणचा घोळच
महावितरणचा घोळ कायमचाच आहे. कधी भारनियमन तर कधी काही तांत्रिक बिघाड झाल्यामुले वीज खंडीत केली जाते. उन्हाळ्यात वीज खंडीत करणे दरवर्षीचे आहे. पावसाळा तोंडावर आल्याने झाडे, नालेसफाई करणे या कारणास्तव वीज खंडीत केली जाते. विजेच्या दाबातही सातत्याने चढउतार होत असल्याने विजेची उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाणही काही महिन्यांपासून वाढीस लागले आहे. पुन्हा अशा प्रकारांना नेमके जबाबदार कुणाला धरायचे अशी काही सोय आपल्या व्यवस्थेत नाही.
ऋतुजा जोशी, डोंबिवली

Story img Loader