शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचते आहे.. वा. रा. कांत यांच्या या कवितेच्या ओळींची आठवण व्हावी असा एक क्षण ठाणेकरांनी या आठवडय़ात अनुभवला. निमित्त होते कविवर्य वसंत सावंत यांच्या स्मृतींना कोमसापने दिलेल्या उजाळ्याचे.
बाहेर बऱ्यापैकी उन्हे तापू लागली आहेत. घामाने अंग डबडबू लागले असताना दुसरीकडे चैत्राची पालवी घेऊन निसर्ग नव्या फलोऱ्यांनी फुलला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे कविमनाला हवाहवासा वाटणारा हा ऋतू.. अशा वेळी कोकण मराठी साहित्य परिषदेने नव्या पिढीच्या काहीसे विस्मृतीत गेलेले कवी वसंत सावंत यांच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सावंतवाडी येथे जन्मलेले आणि अनेक वर्षे मुंबईत वास्तव्य असणारे वसंत सावंत हे मराठी कवितेमधील एक महत्त्वाचे कवी होते. त्यांचे देवराई, माझ्या दारातील सोनसाफ्याचे झाड, वसा हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. कोकणच्या लाल मातीचा गंध हृदयात घेऊन जपणाऱ्या या कवीने कोकणातील ग्रामीण जीवन, संस्कृती, त्याचे हुंकार, आरोह, अवरोह, गुरे-ढोरे, झाडे मराठी साहित्यात आणली. त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात असणाऱ्या ‘बैल’ किंवा ‘सुतारपक्षी’ या कवितांसह अनेक कविता गाजल्या. पण नवीन पिढीच्या बदलत्या काळओघात हा कवी थोडा विस्मृतीत जातोय असे वाटत असताना कोमसापने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ठाण्याच्या टाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या पत्नीसह पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुस्कर, सतीश सोळांकुरकर, विनोद पितळे, मेघना साने आणि बाळ कांदळकर यांनी कवितांना, आठवणींना उजाळा दिला. ‘वसंत संध्या’ या नावाने झालेल्या या कार्यक्रमात निलिमा वसंत सावंत यांनी डॉ. सावंत यांची स्मृतिचिन्हे व शाल आपण जपून ठेवल्याचे सांगत त्या कोमसापला देण्याचे जाहीर केले. माळगुंड येथील केशवसुत स्मारकामध्ये या त्यांच्या आठवणी जतन करण्यात येणार आहेत. खरे तर मराठी साहित्यात अनेक कवी आणि लेखक झाले. त्यांची स्मारके अथवा स्मृती जतन झाल्याच असे नाही. त्यामुळे त्यांची हस्तलिखिते, पुस्तके, सन्मान आणि अन्य आठवणी या कुटुंबांकडे राहिल्या, तर काही जणांच्या काळाच्या ओघात हरपूनही गेल्या. पण कोमसापने वसंत सावंत यांच्या या आठवणीही जपून ठेवण्यात पुढाकार घेऊन एक स्तुत्य उपक्रमही हाती घेतला आहे. खरे तर कोकणातील अशा सर्वच साहित्यिकांच्या आठवणी जपून ठेवण्याचे काम कोमसापने यापुढच्या काळात करायला हवे.
मुंबई, ठाण्यासारखी शहरे वाढत जात आहेत, आकाशाशी स्पर्धा करीत आहेत. अशा वेळी या शहारांच्या भाऊगर्दीमध्ये अनेक जण हरवून जातात. काळाच्या ओघात काही नावे मागे पडतात. आयुष्यभर खस्ता खाणारा कवी किंवा लेखक मृत्यूनंतर शिल्लक राहतो तो आपल्या अक्षरप्रपंचानेच. तसा विचार केला तर वसंत सावंत यांची कविता ही अजरामर आहे. मराठीतील अनेक पुरस्कार त्यांच्या कवितेला मिळाले. त्यांनी साहित्य चळवळ वाढविण्यासाठी कोकणात काम केले. त्यामुळे कवितेच्या पलीकडे असलेल्या आणि माणूस म्हणूनसुद्धा मोठय़ा असलेल्या या कवीची ठाण्यात आठवण करून कोकणातील हिरवाईच्या अस्सल कवितेचा झालेला हा जागर शहराच्या एका भागात असला तरी त्याची आवर्जून दखल घ्यावी असाच होता. कवीच्या मृत्यूनंतर साठ किंवा शंभर वर्षांनी काही माणसांनी एकत्र येऊन त्याची केलेली आठवण ही मरणोत्तर मिळणाऱ्या पुरस्कारासारखीच ठरावी अशीच असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा