ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या काव्यग्रंथाचे ‘मराठी भाषादिनी’ प्रकाशन
भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी तब्बल सातशे वर्षांपूर्वी लिहिलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा आजही मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ समजला जातो. मूळ प्राकृत भाषेत असलेल्या ‘ज्ञानेश्वरी’तील ओव्यांचे अर्थ समजून घेणे आजही अनेकांना कठीण जाते. त्यामुळेच गीतेवर आधारित या टीकाग्रंथाचे निरूपण आजवर अनेकांनी केले. मात्र ठाण्यातील अशोक केळकर यांनी ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीचा अर्थ सोप्या मराठीत काव्यबद्ध करून एक वेगळा प्रयत्न केला आहे. सेवानिवृत्तीनंतर हाती आलेला वेळ आवडता छंद जोपासण्यासाठी केळकर यांनी आरंभलेला हा काव्यप्रपंच ग्रंथरूपात एकवटला असून येत्या शनिवारी, मराठी भाषादिनी त्याचे प्रकाशन होणार आहे.
संस्कृतमधील भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. मात्र प्रचलीत काळात ज्ञानेश्वरांची ती भाषाही बहुतेकांना समजून घेणे कठीण जाते. त्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’वरील भाष्य आणि टीकांचा आधार घ्यावा लागतो. ‘ज्ञानेश्वरी’ ही
मूलत: ओवीबद्ध म्हणजेच काव्यमय रचना असली तरी त्याचे विवेचन करणारे बहुतेक ग्रंथ हे गद्यरूप आहेत. हीच बाब ओळखून केळकर यांनी ज्ञानेश्वरी काव्यबद्ध करण्याचा विडा उचलला.
अशोक केळकर युनियन बँकेत अधिकारी होते. २००८ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी उपलब्ध झालेला मोकळा वेळ इतिहास आणि अध्यात्म या आवडीच्या विषयांसाठी दिला. चार वर्षांपूर्वी वयाच्या ६४व्या वर्षी त्यांनी एकेका ओवीवर काव्य करण्यास सुरुवात केली. सलग तीन वर्षांनंतर गेल्या आषाढी एकादशीला त्यांचे काम पूर्ण झाले.
‘ज्ञानेश्वरी’बरोबरच ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवतेकडे मागितलेल्या पसायदानाचा भावार्थही सोप्या मराठीत मांडला आहे. तीन वर्षांच्या अखंड चिंतन आणि मननातून त्या प्रत्येक ओवीचे सार चार ओळींच्या छंदबद्ध काव्यरचनेत मांडण्यात केळकर यशस्वी झाले आहेत. येत्या शनिवारी-मराठी भाषादिनी ठाण्यात त्यांचे हे काव्य ग्रंथरूपाने प्रकाशित होणार आहे.
साधारण सकाळी लवकर उठून मी नियमितपणे लेखन करीत होतो. दरम्यानच्या काळात पाच महिन्यांसाठी आम्ही उभयता मुलीकडे-इंग्लंडला गेलो होतो. मात्र तिथेही माझ्या या नियमात मी खंड पडू दिला नाही. लिहित असलेले काव्य ज्ञानेश्वरीच्या काही अभ्यासकांना दाखविले. त्यांनी कौतुक आणि शाबासकी दिलीच, शिवाय ग्रंथरूपाने हे काव्य प्रसिद्ध करण्याविषयी सुचविले. भाषेच्या अडचणीमुळे या अमृततुल्य ग्रंथाच्या आस्वादापासून वंचित राहिलेल्यांना माझ्या या प्रयत्नाचा निश्चितच उपयोग होईल.
-अशोक केळकर
अशी आहे काव्यरचना
मराठीचा हा माझा बोल
अमृतासही पैजे जिंकेल
मिळवित मी अक्षरे रसाळ,
शब्दांची गुंफण्यास माळ
सप्तसुरांचे रंगहि थोडे
फिक्कट भासतील अक्षरांपुढे
कोमल, मोहक अक्षर ओढे
गंधगर्व तो मोडुनि पडे
रसाळतेच्या लोभापोटी
कानांच्याही जिव्हा होती
बोल असे ते मिळण्यासाठी
सकल इंद्रिये भांडू लागती..