‘एक रात्र कवितेची’ कार्यक्रमात चाळीसहून अधिक काव्यांचे वाचन
मराठी भाषेसोबत हिंदी, उर्दू, संस्कृत, कोकणी अशा अनेक भाषांतील कविता सादर करीत डोंबिवलीतील रसिकांनी शनिवारी कवितांची शब्दमैफल अनुभवली.
मराठीतील काव्य तर हिंदीतील गझल आणि यासह उर्दूतील मुशाहिरे आणि रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद अशा भावपूर्ण वातावरणात डोंबिवलीतील काव्यरसिक मंडळाची शब्दमैफल रंगली. शनिवारी झालेल्या ‘एक रात्र कवितेची’ या कार्यक्रमात सुमारे ४० हून अधिक काव्यप्रेमींनी पहाटे पाच वाजेपर्यंत काव्यवाचनाचा आनंद लुटला. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात काव्यवाचनाचा अथवा सादरीकरणाचा छंद असूनही त्याकरिता वेळ देता येत नसल्याची अनेकांची तक्रार असते. अशा रसिकांकरिता डोंबिवलीतील काव्यरसिक मंडळाने अभिनव कल्पना मागील वर्षी अमलात आणली. दिवसा काम करणाऱ्या रसिकांकरिता संपूर्ण रात्रभर काव्यवाचनाची संधी देणाऱ्या ‘एक रात्र कवितेची’ या उपक्रमाची नांदी मागील वर्षी करण्यात आली. उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असून शनिवारी रात्री ५ ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम रंगला. या वेळी सुमारे ४० हून अधिक काव्यरसिकांनी त्यात सहभाग घेतला होता. तरुण कलाकारांसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतलेल्या या मैफलीत नव्या स्वरचित कवितांसह गाजलेल्या कवितांचेही सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी सतीश सोळंकुरकर यांचे कविता वाचन झाले. त्यांना रसिकांची दाद मिळाली. या वेळी मंडळाचे सर्वात जुने सदस्य यशवंत देव यांनी कवयित्री शांता शेळके यांच्या आठवणींना उजाळा दिला. किस्से, गप्पा, गोष्टी, गाणी यांच्यात रंगलेली ही मैफल पहाटे पाचच्या सुमारास संपली. यामध्ये नवोदित कवींना व्यासपीठ मिळाल्याने फेसबुक, व्हॉटस्अॅपसारख्या माध्यमावर गाजणाऱ्या कविता थेट रसिकांपुढे सादर झाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2016 रोजी प्रकाशित
डोंबिवलीकरांनी अनुभवली काव्यवाचनाची ‘शब्दमैफल’
डोंबिवलीतील रसिकांनी शनिवारी कवितांची शब्दमैफल अनुभवली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 24-05-2016 at 05:48 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poetry event organisers in dombivli