ठाणे स्थानक परिसरात बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्या ३३ पोलिसांच्या वाहनांवर ठाणे वाहतूक शाखेने मंगळवारी कारवाई केली असून या वाहन चालकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दोन पोलिसांवरही वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी कारवाई केली आहे. या कारवाईच्या निमित्ताने पोलिसांना कोणतीही सूट देण्यात आलेली नसल्याचे वाहतूक शाखेने दाखवून दिले आहे.
शहरातील बेकायदा पार्किंगमधील वाहनांवर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येते. मात्र, अनेकदा पोलीस बेकायदा पार्किंगमध्ये वाहने उभी करतात.
या वाहनांवर कारवाई होत नसल्यामुळे अनेकदा वाहतूक पोलीस टीकेचे धनी ठरतात. यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी आता बेकायदा पार्किंगमधील पोलिसांच्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे.
उपायुक्त रश्मी करंदीकर या काही कामानिमित्त मंगळवारी ठाणे स्थानक परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी तिथे बेकायदा पार्किंगमध्ये पोलिसांची वाहने उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वाहनांवर ‘पोलीस’ अशी अक्षरे आणि ’पोलिसांचा लोगो’ लावण्यात आले होते. या वाहनांवर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ३३ वाहनांवर करून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला. याशिवाय, दुचाकी चालवित असताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दोन पोलिसांवरही  कारवाई करण्यात आली.
हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २७२ पोलिसांवर गेल्या तीन महिन्यात वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केल्याच्या वृत्तास  दुजोरा देत अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे करंदीकर यांनी स्पष्ट केले.

Story img Loader