कल्याण : कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे स्वता रात्रीच्या वेळेत रस्त्यावर उतरले आहेत. गांजा, अंमली पदार्थ सेवन, मद्याचे अड्डे शोधून काढून तेथे विक्री करणाऱ्या आणि सेवन करणाऱ्या अशा दोघांना घटनास्थळी पकडून त्यांची कानउघडणी करून, त्यांना वर्दीचा दणका देऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जात आहे.
कल्याण पूर्वेत बुधवारी रात्री दहा गांजा सेवन करणाऱ्यांना कोळसेवाडी पोलिसांनी पकडले होते. त्यांची कानउघडणी करून त्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा करून नंतर सोडण्यात आले. पु्न्हा उघड्यावर कोठे गांजा किंवा अंमली पदार्थ सेवन करताना आढळले तर अटकेची कारवाईची तंबी या तळीरामांना देण्यात आली. गुरुवारी रात्री खडेगोळवली भागात आठ जणांना उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्या तळीरामांना पकडण्यात आले. त्यांची ‘हजेरी’ उपायुक्त झेंडे यांनी घेतली.
उपायुक्तांच्या आक्रमक पवित्र्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कृतीशील झाले आहेत. मागील चार वर्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा आक्रमक दणका कल्याण, डोंबिवलीतील मद्यधुंद, तळीराम, गांजा सेवन करणाऱ्यांना पाहण्यास मिळाला नव्हता. त्याची चुणूक आता उपायुक्त झेंडे यांनी दाखविण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईमुळे रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात गांजा सेवन करणाऱ्या टवाळखोरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
खडेगोळवलीत धाड
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात एका निर्जन ठिकाणी आठ टवाळखोर अंमली पदार्थ, मद्य सेवन करत असल्याची माहिती उपायुक्त झेंडे यांना मिळाली. या सर्वांना पकडून पोलिसांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हजर केले. या सर्वांची कानउघडी करत, वर्दीचा दणका दाखवत, त्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. उठाबशा काढताना अनेक जण कण्हत कुथत होते. हा प्रकार परिसरातील नागरिक हास्य करत पाहत होते. उपायुक्तांच्या दणक्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे. उपायुक्तांनी एकदा डोंबिवली खाडी किनारी फेरफटका मारण्याची मागणी नागरिक करत आहेत.
नवीन वर्षानिमित्त रस्तोरस्ती मद्यधुंद मद्यपी, टवाळखोर, गर्दुल्ले नागरिकांंना त्रास देण्याची शक्यता विचारात घेऊन, तसेच कल्याण परिसरातील वाढती गुन्हेगारी विचारात घेऊन उपायुक्तांनी टवाळखोरांंविरुध्द मोहीम उघडली आहे.कल्याण परिसरातील लैंगिक अत्याचाराच्या घटना विचारात घेऊन आठ पोलीस ठाणे हद्दीत एकही मद्यधुंद मद्यपी, टवाळखोर, तळीराम रस्त्यावर दिसणार नाही. नागरिकांना त्यांचा त्रास होणार नाही. त्यांचे अड्डे कुठेही दिसता कामा नयेत. असे कोणी भेटले त्याला तेथेच पकडून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस ठाण्यांना केल्या आहेत. अतुल झेंडे पोलीस उपायुक्त.