लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : दिवाळीला सुरूवात झाली असल्याने शुक्रवार ते रविवार या दिवशी ठाण्याच्या बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची चिन्हे आहेत. मुख्य शहरातील बाजारपेठांमधून होणाऱ्या या गर्दीमुळे कोंडी टाळली जावी यासाठी वाहतूक पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे.

मुख्य शहरातील राम मारूती रोड, गोखले रोड, बाजारपेठेत गुरुवारपासून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बेशीस्तीने रस्त्याच्या कडेला वाहने उभ्या करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई केली जात आहे. व्यापारी मंडळानेही पोलिसांना मदतीसाठी वाहतुक साहाय्यक उपलब्ध करून दिले आहेत. या भागात पोलिसांकडून गस्ती घातली जात आहे. एखाद्या ठिकाणी वाहतुक कोंडी झाल्यास तात्काळ त्याठिकाणी कर्मचारी उपलब्ध राहून वाहतुक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केले जात आहेत. दिवाळी निमित्ताने ठाणे शहरातील विविध भागातून नागरिक जांभळीनाका, मुख्य बाजारपेठ, नौपाडा येथील राम मारूती रोड, गोखले रोड परिसरात वस्तू खरेदीसाठी येत असतात. यावर्षी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी झुंबड उडत आहे. येत्या तीन दिवसांत खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी गर्दीच्या चौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी व्यापारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर व्यापारी मंडळाने पोलिसांच्या मदतीसाठी काही वाहतुक साहाय्यक उपलब्ध केले आहेत. त्यामुळे या वाहतुक साहाय्यकांची पोलिसांना मदत होत आहे. यासह येथील मुख्य चौकात एक अधिकारी आणि चार ते पाच कर्मचारी तैनात असतील.

आणखी वाचा-डोंबिवली, कल्याणमध्ये हवा, ध्वनी गुणवत्तेची दर्शक यंत्रणा

वाहतुक कोंडी झाल्यास अनेकदा समाजमाध्यमांवर नागरिकांकडून माहिती दिली जाते. त्यामुळे समाजमांध्यमावरही नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष असेल. एखाद्या ठिकाणी वाहतुक कोंडी झाल्यास नियंत्रण कक्षातील कर्मचारी तात्काळ त्या विभागात उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती देतील. त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळेत गस्ती वाहनातून पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी संबंधित विभागातील पोलीस ठाण्यातील कर्मचारीही ठिकठिकाणी गस्ती घालत आहे.

ठाण्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात आहेत. व्यापाऱ्यांकडूनही वाहतुक साहाय्यक उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोंडी सोडविण्यासाठी मदत होईल. -डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police are ready to prevent the traffic in diwali markets mrj
Show comments