कल्याण – डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागात राहत असलेल्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने सापळे लावून गुरुवारी अटक केली. कोणत्याही कागदपत्रांविना भारतात घुसखोरी करून हे पाच बांग्लादेशी डोंबिवली, कल्याण शहरात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर देशमुख होम्स शेजारी असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीत चार बांग्लादेशी घुसखोर, कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात बांग्लादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून मानपाडा, महात्मा फुले पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करून या बांग्लादेशी नागरिकंना अटक करण्याचे नियोजन करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर झोपडपट्टी, रेल्वे स्थानक भागात एका वेळी पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत डोंबिवलीतील देशमुख होम्स शेजारील गांधीनगर झोपडपट्टीतून चार बांग्लादेशी घुसखोर, कल्याण रेल्वे स्थानक भागातून एक बांग्लादेशी नागरिक अटक करण्यात आला.

या बांग्लादेशी नागरिकांकडे भारतात वास्तव करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे पोलिसांनी मागितली. ती त्यांना दाखविता आली नाहीत. हे पाच बांग्लादेशी भारतात विनापरवाना, बेकायदेशीर राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर मानपाडा, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चार महिला आणि एक पुरूषाचा समावेश आहे. परकिय नागरिक कायदा कलमाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या महिनाभरात पोलिसांनी कल्याण, डोंबिवली परिसरातून सुमारे २५ हून अधिक घुसखोर बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. बहुतांशी बांग्लादेशी नागरिक चाळी, झोपडपट्टी भागात राहत आहेत. ते मजुरी, चालक म्हणून काम करतात. महिला शहर परिसरातील बारमध्ये सेविका (वेटर) म्हणून काम करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Story img Loader