डोंबिवली – मुंबई, डोंबिवली परिसरातील जैन मंदिरांच्या मध्ये सोवळ्यात दर्शनाच्या निमित्ताने जाऊन देव्हाऱ्यातील धार्मिक विधीसाठी लागणारा चांदीचा ऐवज चोरणाऱ्या सराईत चोरट्याला रामनगर पोलिसांनी गिरगाव मधील खेतवाडी भागातून मंगळवारी अटक केली. मुंबईत नऊ पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जैन मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. नरेश अगरचंद जैन (४७) असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील गिरगाव मधील खेतवाडी गल्ली चार मधील राधाकृष्ण इमारतीत राहतो.
हेही वाचा >>> डोंबिवली : रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या राहुलनगरमधील दोन्ही इमारती बेकायदा; नगररचना विभागाचा अहवाल
मागील आठवड्यात डोंबिवलीतील आदिनाथ गृह जिनालय (टाटा पॉवर लाईन), श्री पार्श्वगज जैन संघ मंदिर (रामनगर), शांतिलाल जैन मंदिरातून (मानपाडा) सकाळी १० ते पाच वेळेत देव्हाऱ्यातील चांदीची फुले, चांदीची लगड, चांदीचे ताट, आरती ताट, निरंजन, पंचपाळ, चांदीचा कलश, चांदीचा नारळ असा एकूण सोळाशे ग्रॅम वजनाचा ९५ हजार रूपये किमतीचा चांदीचा ऐवज चोरीला गेला होता. भाविकाच्या वेशात मंदिरात येऊन एका भामट्याने हे चोरीचे कृत्य केल्याचे मंदिरांमधील सीसीटीव्ही चित्रणातून दिसून आले होते. एकच भाविक या तिन्ही चोऱ्यात करत असल्याचे दिसून आले होते.
हेही वाचा >>> कर्जत जवळील केळवली रेल्वे स्थानकात दुचाकीवरून प्रवास
या तिन्ही चोऱ्या प्रकरणी भावीन अमृतलाल संगोई (४१, रा. टाटा पॉवर लाईन, मानपाडा रस्ता) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, हवालदार सुनील भणगे, विशाल वाघ, सचीन भालेराव, हनुमंत कोळेकर, तुळशीराम लोखंडे, शिवाजी राठोड यांचे तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने चोरीची तक्रार असलेल्या जैन मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यांना एकच चोर भाविकाच्या वेशात येऊन मंदिरात चोरी करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तो गिरगाव खेतवाडी मधील रहिवासी होता. मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्याच्या गिरगाव मधील घरी छापा टाकून आरोपी नरेश जैन याला अटक केली. त्याने आतापर्यंत मुंबईतील विविध जैन मंदिरांंमधून चांदीचा ऐवज लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ८० हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.