दिवा येथील साबे गावात २५ वर्षांपूर्वी झालेला बाळाराम म्हात्रे यांचा खून तसेच ठाण्यातील हाजुरी भागातून दहा वर्षांपूर्वी झालेले एका मुलाचे अपहरण अशा दोन्ही गुन्ह्य़ांचा छडा लावत त्यातील आरोपींना जेरबंद करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. इतकी वर्षे आरोपी सापडत नसल्याने ही प्रकरणे फाइलबंद होण्याच्या मार्गावर असतानाच उत्तर प्रदेशमधील ग्रामपंचायत निवडणुकांतील पोस्टरबाजीतून पोलिसांना या आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेचच या आरोपींवर झडप घातली.
दिवा येथील साबा गावात राहणारे बाळाराम म्हात्रे यांचा २५ वर्षांपूर्वी खून झाला होता. त्यांच्या अंगरक्षकाने साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आले होते. या खुनानंतर अंगरक्षक आणि त्याचे साथीदार फरार झाले होते. गेली कित्येक वर्षे पोलिसांना ते गुंगारा देत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने या गुन्ह्य़ाचा छडा लावून दोन आरोपींनी जेरबंद केले.
अंगरक्षक विजयसिंह ऊर्फ अनिल रामसागर चौबे आणि उदयभान रामआधार सिंह अशी दोघा आरोपींची नावे असून त्यांना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्य़ातील औरांव गावात विजयने स्वत:चा राजकीय दबदबा निर्माण केला होता. गेली २० वर्षे तो गावचा सरपंच होता. तसेच उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्य़ातील ठाणा गावातून उदयभान याला अटक करण्यात आली असून त्यानेही गावामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण केले होते. तो सुद्धा गेली १५ वर्षे सरपंच होता.
दरम्यान, उत्तर प्रदेशात दीड महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. विजय याने त्याच्या आईला तर उदयभान याने त्याच्या पत्नीला ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये विजय आणि उदयभान हे दोघेही उतरले होते आणि त्यासाठी गावामध्ये पोस्टर्स लावले होते. मात्र, या दोघांची पाश्र्वभूमी माहीत होताच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्याबाबत ठाणे पोलिसांना कळवली. पोलिसांनी मग खातरजमा करून दोघांनाही अटक केली.
ठाणे येथील हाजुरी परिसरातील दहा वर्षांपूर्वी घडलेला अपहरणाचा गुन्हा उघडकीस येण्यामागेही उत्तर प्रदेशातील ग्रामपंचायत निवडणुका आहेत. एका दहा वर्षीय मुलाचे अपहरण करून फरार झालेला कादिर ऐश महम्मद चौधरी (५०) याने उत्तर प्रदेशात पलायन केले होते. या राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्य़ातील बतोरिया गावात राजकीय बस्तान बसविले होते. त्याला ताब्यात घेण्यासाठी वागळे पोलिसांची पथके गावात गेली होती. मात्र, पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच चौधरी नेपाळमध्ये पळून जात असे. दीड महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तो स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. मात्र, त्याच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराने त्याची माहिती ठाणे पोलिसांना कळवल्याने तो पोलिसांच्या जाळयात सापडला.