डोंबिवली: येथील पूर्वेतील दत्तनगर उद्यानाजवळ कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडाला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार अटक केली. डोंबिवली परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्या बद्दल या गुंडाला पोलिसांनी १८ महिन्यांसाठी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते (२८) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात शस्त्र, धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजविणे, शांततेचा भंग करणे असे चार गुन्हे दाखल आहेत. तडीपार असताना सागर पुन्हा डोंबिवलीत दिसू लागल्याने शहरातील नागरिक अस्वस्थ होते.
तडीपार सागर दाते डोंबिवलीत धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार दत्ताराम भोसले यांना शनिवारी मिळाली होती. त्यांनी ही माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, विश्वास माने, मिथुन राठोड यांनी दत्तनगर भागात जाऊन सापळा लावला.
प्रगती महाविद्यालया समोरील उद्याना जवळून तडीपार सागर दाते हातात कोयता घेऊन दहशत माजवित चालला असल्याचे दिसताच साध्या वेशातील पोलिसांनी त्याला घेरले. त्याने कोयत्याचा धाक दाखवून पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याचा कोयता प्रथम काढून घेतला. त्याला पथकाने घेरून अटक केली. सागरवर संघटित गुन्हेगारी कायद्याने गुन्हे दाखल आहेत. सागरला अटक करून त्याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या पोलिसांकडून त्याला जिल्ह्याच्या बाहेर सोडण्याची कार्यवाही करण्यात आली.