कल्याण : रेल्वे स्थानक भागात कार्पाेरेट गणवेशात फिरुन एटीएम मधून बाहेर पडणाऱ्या नागरिकाला बोलण्यात गुंतवून, त्याला भुरळ घालून संमोहित करुन त्याच्याकडून एटीएम कार्ड काढून घ्यायचे. त्याचा गुप्त संकेतांक समजून घ्यायचा आणि नंतर त्या ठिकाणाहून पळून जाऊन फसवणूक केलेल्या ग्राहकाच्या बँकेच्या खात्यामधून एटीएमच्या साहाय्याने पैसे काढाचये. अशा कार्यपध्दतीने भुरट्या चोऱ्या करणाऱ्या एका भामट्याला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

या भुरट्याकडून पोलिसांनी ग्राहकांची फसवणूक करुन ताब्यात घेतलेली विविध बँकांची ३३ एटीएम कार्ड जप्त केली आहेत. राहुलकुमार ज्योती शेनमुगा (३८, रा. लक्ष्मीनगर, कांचीपुरम, चेन्नई, तमीळनाडू) असे आरोपीचे नाव आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले, वसंत आगीवले (रा. मंगलाप्रस्थ सोसायटी, डाॅन बाॅस्को शाळेजवळ, कल्याण पश्चिम) यांनी गेल्या पाच दिवसापूर्वी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका समोरील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून १० हजार रुपये काढले.एटीएम मधून बाहेर येताच त्यांना एका इसमाने बोलण्यात गुंतविले. वसंत यांना काही कळण्याच्या आता भामट्याने त्यांना भुरळ घालून संमोहित करुन त्यांच्या जवळील सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड स्वता जवळ घेतले. त्याचा गुप्त संकेतांक समजून घेतला.

हेही वाचा : पलावा पूल, एमआयडीसीतील रस्ते लवकर पूर्ण करण्याची सुबुध्दी यंत्रणांना दे ; मनसे आ. प्रमोद पाटील यांचे गणरायाला साकडे

स्टेट बँकेचे प्रवीण घोडके नावाचे एटीएम कार्ड वसंत आगीवले यांना दिले. भुरळ घातली असल्याने सुरुवातीला वसंत यांना काही समजले नाही. घरी आल्यानंतर त्यांना काही वेळाने आपल्या जवळ एटीएम कार्ड नसल्याचे दिसले. तसेच वसंत यांच्या मोबाईलवर त्यांनी स्वता व्यवहार केले नसताना २७ हजार ५३६ रुपये त्यांच्या बँक खात्यांमधून वळते केले असल्याचे दिसले. आपल्या अपरोक्षक अज्ञात इसमाने हा व्यवहार केला आहे म्हणून वसंत यांनी तातडीने बँकेला यासंदर्भात कळवून आपल्या बँक खात्यामधून कोणतेही रक्कम कोणाला वळती करू नये म्हणून सुचविले.कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळ भेटलेल्या भामट्याने हा सगळा प्रकार केला असावा असा संशय व्यक्त करुन वसंत यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला.

हेही वाचा : ठाणे : कळव्यातील वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आढळला

साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश मान पाटील, वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सचीन भालेराव, सुचीत टिकेकर, सुचीत मधाळे, महेंद्र बरफ, विष्णु दास यांनी तपास सुरू केला. तपास पथकाने एचडीएफसी एटीएम केंद्रा बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवून त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. दोन दिवस रेल्वे स्थानका बाहेरील प्रत्येक एटीएम केंद्रा बाहेर तपास पथक साध्या वेषात गस्त घालून होते.

हेही वाचा : ठाणे : गणेशोत्वाच्या मंडपावर झाड कोसळले ; एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा एक इसम रेल्वे स्थानक भागात फिरत असल्याची खात्री पटल्यावर पथकातील पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने रेल्वे स्थानक भागात नागरिकांना फसवून त्यांची लुटमार करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याने अंबरनाथ शिवाजीनगर भागात एका नागरिकाची १५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. वसंत आगीवले यांची फसवणूक त्याने केली होती. आरोपी राहुलकुमारच्या झडतीमधून पोलिसांनी ३३ विविध बँकांची एटीएम कार्ड जप्त केली आहेत. या भुरट्याने आणखी किती ठिकाणी अशी फसवणूक केली आहे. याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे करत आहेत.

Story img Loader