ठाणे :
ठाणे परिसरातून लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली. या टोळीच्या तावडीतून दोन वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळी लहान मुलांची विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.
मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात राहणाऱ्या दोन वर्षीय मुलाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. हा मुलगा घराबाहेर खेळत असताना अपहरणकर्त्यांनी त्याला पळवून नेले होते. शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी मुलाला पळवून नेत असताना एका महिलेने पाहिले होते. तिच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची माहिती मिळविली होती. खबऱ्यांच्या मदतीने माग काढून पाच जणांना अटक केली.
दिवा आणि दहिसर या भागातून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून अपहृत मुलाची अवघ्या २४ तासांत सुटका करण्यात आली. अपहरणानंतर या मुलाला कुठे ठेवण्यात आले होते, याबाबत पोलिसांकडून माहिती मिळू शकलेली नाही.
या आरोपींना सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासात लहान मुलांच्या अपहरणाचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मुलांची हत्या?
अपहरण केलेल्या काही मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह महापे रस्त्याजवळील डोंगर भागात पुरल्याची माहिती आरोपीने दिली होती. त्याआधारे पोलिसांनी खोदकाम केले. मात्र त्या ठिकाणी काहीच आढळले नाही.