ठाणे: दिवा स्थानकात रेल्वे खाली उडी घेऊन एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना नुकतीच अटक केली आहे. या तरुणीने ऑनलाईनद्वारे एका कंपनीकडून कर्ज घेतले होते आणि त्याच्या वसुलीसाठी दोघांनी तिच्या छायाचित्रात छेडछाड करून अश्लिल चित्रफित बनवून ती तिच्या नातेवाईकांना पाठविली होती. या प्रकारामुळेच तिने आत्महत्या केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.
शंकर हजोंग (२९) आणि प्रसंजीत हजोंग (३२) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना पंजाब आणि आसाममधून ताब्यात घेतले आहे. दिवा परिसरात एक ३४ वर्षीय मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. ती डोंबिवलीतील एका कंपनीत काम करीत होती. तिने ६ जुलैला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिने एका खासगी वित्त संस्थेतून ऑनलाईनद्वारे कर्ज घेतले होते आणि तिच्या आत्महत्येमागे तेच कारण असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्याआधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या पथकाने सायबर गुन्हे शोध कक्षाच्या मदतीने याप्रकरणाचा तपास सुरू केला होता. गेले चार महिने पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत होते.
हेही वाचा… ठाण्यात दिवाळी कालावधीतच २६ ठिकाणी आगीच्या घटना
शेअर बाजारात तिला पैसे गुंतवायचे होते. त्यासाठी तिने जून महिन्यात एका कर्ज पुरवठा करणाऱ्या ॲपच्या माध्यमातून २१ हजार रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज तिला व्याजासह सात दिवसांच्या आत फेडायचे होते. परंतु तिला पैसे फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी तिला वारंवार संपर्क साधू लागले. तसेच तिचे अश्लिल छायाचित्र तयार करून ते नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊ लागले. काही दिवसांनी त्या कर्मचाऱ्यांनी तरूणीच्या छायाचित्रात छेडछाड करून त्याची अश्लील चित्रफित बनवून ती तिच्या नातेवाईकांना पाठविली. ही बदनामी सहन न झाल्यामुळे तिने ६ जुलैला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती तपासात समोर आली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करून तिची बदनामी करणाऱ्या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचा शोध घेतला. त्यातील शंकर हा आसाम आणि प्रसंजीत हा पंजाब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याठिकाणी जाऊन पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिस चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणात मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.
कर्ज पुरवठा करण्यापूर्वी संबंधित कंपनी कर्जदारांकडून त्यांचे कागदपत्र, छायाचित्र मागवून घेतात. कर्ज पुरवठा केल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जातो. तसेच शिवीगाळ केली जाते. काही दिवसांनी पुन्हा कर्ज घेणाऱ्याच्या छायाचित्रात संबंधित कंपनीचे कर्मचारी छेडछाड करून त्या व्यक्तीला पाठवून धमकावतात. तसेच हे छायाचित्र तिच्या दररोज संपर्कात असलेल्यांना पाठविले जाते. या बदनामीमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.