डोंबिवली– डोंबिवलीत दोन परस्पर विरोधी घटनांमध्ये एका सराफाने ग्राहकांना सोन्याचे दागिने घडवून देतो सांगून ग्राहकांकडून १५ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने घेतले. ते दागिने परत न करता सराफ दुकान बंद करुन पळाल्याने ग्राहकांची फसवणूक झाली. दुसऱ्या घटनेत एका सराफाच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन भुरट्या महिलांनी सराफाची नजर चुकवून ८० हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरुन नेला.
रामनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
विष्णुनगर पोलिसांनी सांगितले, आरोपी बजरंग दास (४०) सराफाचे डोंबिवली पश्चिमेतील जयहिंद काॅलनीमध्ये आर. के. भोईर इमारतीत शिव मंदिरा जवळ कमल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दुकान मालक बजरंग दास यांनी ग्राहक उमेश नारायण भोईर (६१, रा. साईकृपा चाळ, वेताळनगर, मोठागाव, डोंबिवली) आणि अन्य एका ग्राहकाला मी तुम्हाला सोन्याचे दागिने घडवून देतो, असे सांगून एप्रिल मध्ये उमेश भोईर व अन्य एका ग्राहकाकडून एकूण ३७ ग्रॅम वजनाचे १५ लाख ८० हजार रुपयांचे दागिने स्वताच्या ताब्यात गहाण म्हणून घेतले.
हेही वाचा >>> डोंबिवलीत गावदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर हातोडा
सराफाने विश्वासाने दागिने घडवून देण्याची हमी दिली. एप्रिलनंतर उमेशसह अन्य ग्राहकाने घडविलेले दागिने परत करण्याची मागणी सराफाकडे सुरू केली. वेळकाढूपणाची उत्तरे देऊन सराफ दोन्ही ग्राहकांना टोलवाटोलवी करत होता. काही महिन्यांपासून सराफाने दोन्ही ग्राहकांच्या मोबाईल संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. एक दिवस बजरंग यांनी दुकान बंद करुन पलायन केले. त्यांना संपर्क करुनही ते प्रतिसाद देत नाहीत. दुकान उघडले जात नाही. दास यांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर उमेश भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत, डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील विनायक ज्वेलर्सचे मालक मांगिलाल गुर्जर (५२) यांची दोन भुरट्या महिलांनी ८० हजाराची फसवणूक केली. रामनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये मेट्रो माॅलजवळ गॅस सिलिंडरचा ट्रक उलटला
पोलिसांनी सांगितले, दोन महिला गुरुवारी सकाळी विनायक ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आल्या. पैंजण खरेदी करायचे आहेत असे बोलून त्यांनी विविध कौशल्य रुपातील चांदीचे पैंजण कामगाराला दाखविण्यास सांगितले. कामगार महिलांना विविध रुपातील वेगळ्या किमतीचे पैंजण दाखविण्यासाठी दुकानाच्या मंचका समोरुन ऐवज आणण्यासाठी दुकानाच्या आतील भागात जात होता. या कालावधीत समोर कोणी नाही पाहून दोन्ही महिलांनी दुकान मालक, कामगाराची नजर चुकवून चांदीचे ८० हजार रुपये किमतीचे दोन पैंजण जोड्या स्वताजवळ दडवून दुकानातून पळून गेल्या. ऐवज मूळ जागी ठेवताना सराफाला पैंजणाच्या दोन जोड्या कमी आढळल्या. त्या ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी चोरुन नेल्याचा दाट संशय आल्याने मांगिलाल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत.