उल्हासनगरच्या अत्यवस्थ बालगोविंदा सुजलच्या निमित्ताने सवाल..
या वर्षी १८ वर्षांखालील गोविंदांना मनाई असताना अनेक मंडळांनी रस्तोरस्ती वरच्या थरावर बालगोविंदांना उन्मादात चढू दिले. त्यातच उल्हासनगरचा १२ वर्षांचा सुजल गडापकर गंभीर जखमी झाल्याने दहीहंडी मंडळांची ही बालबुद्धी कधी थांबणार आणि ती कोण रोखणार, असा संतप्त सवाल जनमानसात उमटत आहे.
सुजलला आम्ही दहीहंडीला जायला विरोध केला होता. गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी मंडळाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी टीशर्टचे वाटप सुरू केले. सुजलनेही एक टीशर्ट घेतला. मग सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सुजल आणि त्याच्या दोन भावांना दहीहंडीची परवानगी दिली. मात्र सुजल लहान असल्याने त्याला थरांत घेणार नाहीत, या समजाला सुजल गंभीर जखमी झाल्याच्या दूरध्वनीने धक्का बसला. कोणते आई-वडील आपल्या मुलाला मृत्यूच्या खाईत लोटतील हो, असा आर्त सवाल सुजल याचे वडील उमेश यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
दहीहंडीवर चढू नकोस, कायद्याने बंदी आहे, त्यामुळे काळजी घे, अशा सूचना मुलांना दिल्या होत्या, असे सुन्न स्वरात सांगताना उमेश व त्यांची पत्नी माला यांच्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या उल्हासनगरातील राधेशाम नगरात राहणारा सुजल गुरूवारी दहीहंडी फोडताना सहाव्या थरावरून पडून जखमी झाला. डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी असलेल्या सुजलवर कल्याणमधील फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असली तरी त्याची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. जखमी सुजलला प्रथम आयोजकांनी शिवनेरी आणि नंतर मेट्रो रुग्णालयात नेले. दोन्ही रुग्णालयांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिल्याने त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू झाले नसल्याबद्दलही संताप व्यक्त होत आहे.
गडापकर कुटुंब प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत तग धरून राहात आहे. गडापकर यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातले मात्र उदरनिर्वाहासाठी ते उल्हासनगरात स्थायिक झाले. म्हातारी आई, घरकाम करून संसाराला हातभार लावणारी पत्नी यांच्यासह किशोर, सुशांत आणि सुजल अशा तीन मुलांसह एका झोपडीवजा घरात ते राहातात. अत्यंत अल्प उत्पन्न असले तरी काटकसर करून मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच त्यांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते. सुरुवातीला रिक्षा चालवून उमेश कुटुंबाचा गाडा कसाबसा सावरत होते. रिक्षातून येणाऱ्या उत्पन्नातून संसार चालवणे कठीण झाल्यानंतर उमेश यांनी रिक्षा सोडून वेल्डिंगच्या कामाला सुरूवात केली.
मुलांना दहीहंडीला जाऊ देण्यास त्यांचा नेहमीच विरोध होता. मात्र मुले हौसेखातर जात होती. यंदा १८ वर्षांखालील मुलांना हंडीला बंदी असल्यामुळे मुलांना पाठवायचेच नाही, असे त्यांनी ठरवले होते. परंतु सगळेच मंडळाचे कार्यकर्ते आले आणि मग सुजल आणि त्याच्या दोन भावांनाही दहीहंडीची परवानगी दिल्याचे उमेश गडापकर सांगतात.
कामावर गेलेल्या उमेश यांचा मोबाइल गुरूवारी सायंकाळी खणखणला आणि मुलगा जखमी झाल्याची बातमी समजली. हे एकून त्यांना धक्काच बसला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाकातून रक्त येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. कल्याणच्या महागडया फोर्टीजमध्ये सुजलवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तपासणी करून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असले तरी उमेश आणि त्यांची पत्नी माला यांच्या मनाचा बांध फुटलेला आहे.
आयोजक आणि अध्यक्षांवर गुन्हा
उल्हासनगरमधील लालचक्की चौकातील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना पदाधिकारी धीरज ठाकूर यांनी १ लाख, ११ हजार, १११ रुपये बक्षिसाची दहीहंडी आयोजित केली होती. गुरूवारी संध्याकाळी राधेश्याम गोविंदा पथक ही हंडी फोडत असताना थराच्या सर्वात वर असलेला सुजल खाली कोसळून जखमी झाल्याप्रकरणी आयोजकांसह शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू माने आणि राधेश्याम गोविंदा पथकाचे योगेश डांगे यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून २० फुटाहून अधिक उंचीची दहीहंडी उभारणे, १८ वर्षांखालील मुलाचा हंडी फोडण्यासाठी वापर करणे, पथकांना सुरक्षेचे कोणतेही साधन उपलब्ध करून न देणे, याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेंद्र शिरसाट यांनी दिली.
- उल्हासनगरमधील राधेशाम नगरात राहणारा १२ वर्षांचा सुजल गडापकर लालचक्की चौकातील शिवतेज मित्र मंडळाच्या दहीहंडीत गंभीर जखमी.
- शिवनेरी आणि मेट्रो रुग्णालयांचा उपचारास नकार. कल्याणच्या फोर्टीसमध्ये उपचार.
- आयोजकांसह शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू माने आणि राधेश्याम गोविंदा पथकाचे योगेश डांगे यांच्यावर गुन्हा दाखल.