बदलापूर: चिमुकल्या मुलींच्या अत्याचारानंतर संतप्त बदलापूरकरांनी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. सातत्याने विनवण्या करून, मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आवाहनानंतरही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला करत दहा मिनिटात रेल्वे रूळ मोकळा केला. पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर आंदोलन रुळावरून हटले. यावेळी काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली.
बदलापुरातील आदर्श शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार नंतर सकाळपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी सहा वाजल्यापासून आदर्श शाळेच्या समोर पालकांकडून आंदोलन सुरू होते. तर साडेनऊ वाजल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. त्यामुळे बदलापूर कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला. पोलीस सातत्याने आवाहन करूनही आंदोलक हटत नव्हते. रेल्वे पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सह स्थानीक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. यामुळे जवळपास नऊ ते दहा तास रेल्वे मार्ग ठप्प होता. अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला सुरू केला. त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटात रेल्वे रूळ मोकळे झाले. आंदोलक लाठी हल्ल्यानंतर चिडले. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक सुरू केली. रेल्वे स्थानकातून आंदोलन हटवल्यानंतर स्थानकाबाहेर आंदोलक रेल्वे स्थानकात शिरण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी त्यांना पळवून लावले.
गेल्या नऊ ते दहा तासांपासून बंद असलेली लोकल सेवा सुरू करणे आवश्यक होते. आता मार्ग मोकळा झाला असून रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी योग्य स्थिती निर्माण करायची आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.