डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सावरकर रस्ता या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या भागात आंबेडकर नगर मधील मोकळ्या जागेत एक इसम गावठी (हातभट्टी) दारूची विक्री करत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन रामनगर पोलिसांनी हा गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त केला.दारू विक्रेता सुनील दाजी गुरव (५३) यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार अजय बागुल यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. सावरकर रस्त्यावरील आंबेडकर वसाहतीजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कोपऱ्यावर अनेक महिन्यांपासून संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत एक इसम गावठी दारू विकत असल्याच्या तक्रारी रामनगर पोलीस ठाण्यात नागरिकांकडून करण्यात येत होत्या.
पाच दिवसापूर्वी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या सूचनेवरून साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटणे, हवालदार कोळी, शिंदे यांनी सावरकर रस्त्यावरील दारू अड्ड्यावर छापा टाकण्याची तयारी केली. हा अड्डा संध्याकाळी किती वाजता सुरू केला जातो. या अड्ड्यावर छापा टाकला तर तेथून दारू अड्डा चालक, ग्राहकांना पळण्यासाठी किती चोरीचे मार्ग आहेत. अशी सर्व माहिती पोलीस पथकाने काढली.
आंबडेकर वसाहतीच्या बाजुला सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कोपऱ्यावर प्लास्टिक डबा, प्लास्टिक पिशव्यांंमध्ये बांधलेली दारूची पुडकी घेऊन इसम बसत असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी चारही बाजुने दारू अड्ड्याला वेढून या अड्ड्यावर छापा टाकला. या अड्डयावरून सुनील गुरव या दारू विक्रेत्याला अटक केली. या दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडला आहे याची माहिती मिळताच दारू पिण्यासाठी आजुबाजुला येऊन थांबलेले ग्राहक पळून गेले.
पोलिसांनी साक्षीदार, पंचांसह या दारू अड्ड्यावरील साहित्य जप्त केले. दारू साठ्याची विल्हेवाट लावली. सुनील गुरव यांच्या विरुध्द दारू प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. मुख्य वर्दळीच्या मध्यवर्गीयांची वस्ती असलेल्या भागात हा दारू अड्डा सुरू असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत होते. अनेक ग्राहक या अड्ड्यावर दारू पिऊन दारूच्या धुंदीत परिसरात सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घालत होते. शांततेचा भंग करत होते. अनेक वाहन चालकांना या धुंदीतील दारूड्यांचा त्रास होत होता. काही मद्यपी पादचाऱ्यांना अडवून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचे प्रकार करत होते. त्यामुळे हा दारू अड्डा बंद करावा, अशी नागरिकांची मागणी होती. रामनगर पोलिसांनी हा दारू अड्डा बंद केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.