लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : धुलिवंदन निमित्ताने कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. शुक्रवारी ठाणे शहरातील जवळपास सर्वच मशिदींभोवती ठाणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पहायला मिळाला. गेल्यावर्षी मुंब्रा शहरात धुलिवंदनाच्या दिवशी किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील मशिदींभोवती पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळाला.
ठाणे जिल्ह्यात धुलिवंदन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आयुक्तालय क्षेत्रातील चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक पोलीस आयुक्त, ८५ पोलीस निरीक्षक, २ हजार ९७९ पोलीस अंमलदार, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, ५२५ गृहरक्षक दल यासह विशेष शाखेचे पाच पोलीस निरीक्षक, १० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ७७ महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले होते.
कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मागील वर्षी मुंब्रा शहरात धुलिवंदनाच्या दिवशी दोन गटांमध्ये वाद झाले होते. या वर्षी धुलिवंदन शांततेत पार पडावा यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच ठाणे पोलिसांकडून संवेदनशील भागात गस्ती घातली जात होती. कापूरबावडी, राबोडी यासह इतर महत्त्वाच्या मशिदींभोवती पोलिसांच्या सुरक्षेचे कडे पहायला मिळाले. गटा-गटांमध्ये किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतली होती.