शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यभरात एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये वादाचे प्रसंग घडू लागल्याचे चित्र आहे. त्यातच गुरुवारी बहुमताची चाचणी घेण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्यानंतर शहरात ठाणे पोलिसांनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या शाखा, मध्यवर्ती कार्यालय, शिवसेनेच्या महत्त्वाचे पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. समाजमाध्यमांवरही आमचे लक्ष असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
सुमारे चार ते पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात –
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसेना असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे समर्थकांनी ठाणे तसेच आसपासच्या शहरामध्ये फलकबाजी सुरू केली आहे. कल्याणमध्ये शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये वादाचेही प्रसंग घडले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष झाले आहेत. ठाणे पोलिसांचा सुमारे चार ते पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या, दंगल नियंत्रण पथकालाही पाचरण करण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत –
ठाणे शहरातील शिवसेनेची तलावपाली येथील मध्यवर्ती शाखा, जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या शाखा, लोकप्रतिनिधींची जनसंपर्क कार्यालये, संवेदनशील भाग, शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासह शहरात स्थानिक पोलिसांकडून गस्ती घातली जात आहे.
माजमाध्यमांवरही शिंदे समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांचे समाजमाध्यम विभाग तसेच स्थानिक पोलिसांकडून समाजमाध्यमे आणि स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वाहिन्यांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे.