कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत किती अधिकृत आणि बेकायदा इमारती आहेत. यामधील किती बांधकामधारकांनी पालिकेच्या परवानग्या न घेता, बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. अशी परिपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांना दिले आहेत.विशेष तपास पथकाने आक्रमकपणे डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणाचा तपास सुरू केल्याने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी लोकप्रतिनिधी, निवृत्त पोलीस अधिकारी यांचाच सर्वाधिक सहभाग या बेकायदा बांधकामांमध्ये असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या ६५ बेकायदा इमारती प्रकरणात आता विशेष तपास पथका बरोबर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हस्तक्षेप केल्याने लोकप्रतिनिधींनी बेकायदा बांधकामांशी पडद्या मागून पाठीराखे असलेल्या बहुतांशी लोकप्रतिनिधींनी या प्रकरणातून आपले अंग काढून भूमाफियांना वाऱ्यावर सोडले आहे. लोकप्रतिनिधी विरुध्द माफिया असे वातावरण कल्याण, डोंबिवलीत तयार झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाणे शहर सौंदर्यीकरणाच्या कामात कुठेही तडजोड नको ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

६५ माफियांच्या विरुध्द रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हे गुन्हे जामीनपात्र असल्याने या गुन्ह्यात पथकाने लोकसेवकांचा सहभाग (सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत) कलम टाकल्याने या बेकायदा बांधकाम प्रकरणात कडोंमपा नगररचना अधिकारी, प्रभागातील साहाय्यक आयुक्त, विभागीय उपायुक्त, महसूल, दस्त नोंदणी अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.सर्वाधिक बेकायदा बांधकामे मानपाडा पोलीस ठाणे हद्द, नांदिवली, देसलेपाडा, आयरे आणि डोंबिवलीत आहेत असे तपास पथकाला आढळले. या बेकायदा व्यवहारात खासगी सावकार, लघु वित्त संस्था, काही मध्यस्थ यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांनी पुरविलेल्या आर्थिक रसद मधून ही बांधकामे उभी राहत असल्याचे पथकाच्या निदर्शनास येत आहे. तपासी अधिकाऱ्यांनी ६५ मधील काही बेकायदा बांधकामांची माहिती घटनास्थळी जाऊन काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या जागेचा सर्व्हे क्रमांक वेगळा, ठिकाण वेगळे आणि बेकायदा इमारत भलत्याच ठिकाणी बांधली आहे, असे निदर्शनास आले.

हेही वाचा >>>डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाण पुलाला नगररचना विभागाचा अडथळा?

पालिकेला आदेश
पालिकेचे आरक्षित भूखंड, सरकारी जमिनींवर ही बेकायदा बांधकामे आहेत. पालिका, शासनाच्या अखत्यारितील जमिनी भूमाफिया हडप करत असताना पालिका अधिकारी काय करत होते. ही बांधकामे रोखण्यासाठी त्यांनी कोणती कार्यवाही केली. टोलजंग बेकायदा इमारती वेळीच का तोडल्या नाहीत असे प्रश्न पथकाने उपस्थित केले आहेत. या सर्व विषयाची परिपूर्ण माहिती असावी म्हणून तपास पथकाने कडोंमपा आयुक्तांना पालिका हद्दीतील बेकायदा, नियमित इमारत बांधकामांची दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>>बेशुद्ध करण्याचे औषध फवारून लूट ; अंबरनाथच्या मोहनपुरम भागातील घटना, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण

ईडीकडे कागदपत्र दाखल
‘ईडी’ने कडोंमपाकडून ६५ भूमाफियांची बनावट बांधकाम परवानग्यांची कागदपत्रे, ‘रेरा’ची प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्र मागविली होती. ही सर्व कागदपत्र पालिकेने ‘ईडी’च्या संचालकांना पाठविली आहेत. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असताना काही माफिया राजकीय मंडळींचे नाव पुढे करुन या प्रकरणात अडथळे आणण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचे कळते.

कल्याण डोंबिवली पालिकेला नियमित, बेकायदा बांधकामांची माहिती दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नियोजनाने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ”- सरदार पाटील ,तपास पथक प्रमुख ,ठाणे गुन्हे शाखा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police investigation team orders kalyan dombivli municipality to file information on illegal constructions amy