लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: येथील मुरबाड रस्ता रामबाग विभागातील ठाकरे गटाचे समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी यांच्या विजय तरुण मंडळाला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस दिली आहे.
या नोटीसीमुळे शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विजय तरुण मंडळाने लोकशाही आणि लोकशाहीचे चारही खांब धोक्यात असल्याचा देखावा आपल्या गणेश मंडपातील मखरामध्ये उभारला आहे. दृकश्राव्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या या देखाव्यात विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि आणि प्रसार माध्यमे हे लोकशाहीचे चार खांब कसे धोक्यात आले आहेत याचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच दहा विद्युत बस
या देखाव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून विजय तरुण मंडळाला नोटीस बजावली आहे. या संदर्भात विजय तरुण मंडळाचे संस्थापक आणि ठाकरे गटाचे समर्थक विजय साळवी यांनी सांगितले की, विजय तरुण मंडळाला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे औचित्य साधून आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन करतो. देश, महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींचे चित्र आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून लोकांना दाखवतो. तसाच प्रयत्न आम्ही यावेळी केला आहे.
देशातील आताचे चित्र पाहिले तर लोकशाही आणि लोकशाहीची नियंत्रक यंत्रणा धोक्यात आली आहे. हेच आम्ही आमच्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेत अनेक महिने विरोधी पक्ष नेता नव्हता. तेथे एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचे चित्र आहे. कार्यकारी मंडळाकडून याची अंमलबजावणी होईलच याची खात्री नाही. न्यायमंडळावरही सरकारचा ताबा असल्याचे चित्र आहे. प्रसार माध्यमांमध्ये भांडवलशाहीचे वर्चस्व आहे. त्यामुळे वास्तवदर्शी चित्र अलीकडे प्रसार माध्यमातून दिसत नाही. स्वीडनच्या एका सर्वेक्षणात भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही दृकश्राव्य फीत आम्ही मंडळाच्या देखाव्यात दाखवली आहे. वास्तवदशी चित्र प्रदर्शित करणे म्हणजे लोकांना जागृत करणे आहे. या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे साळवी यांनी सांगितले.
हेही वाचा… उल्हासनगरच्या मनसेला शहराध्यक्ष मिळेना, ४ महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी बरखास्त केलेली कार्यकारिणी
गेल्या वर्षी विजय तरुण मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यावर राज्यात निर्माण परिस्थितीचे चित्रण आपल्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उभारले होते. तो देखावा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतो म्हणून पोलिसांनी गणपती स्थापन होण्याच्या दिवशीच तो देखावा जप्त केला होता.
मग हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. त्यावेळी न्यायालयाने काही अटी शर्तींवर हा देखावा उभारणीला परवानगी दिली होती. विजय साळवी यांनी शिंदे गटात सामील व्हावे म्हणून गेल्या वर्षापासून त्यांना तडीपारी व इतर दबावातून त्रास दिला जात आहे, असे साळवी समर्थकांनी सांगितले.