कल्याण – सोमवारच्या शिवजयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेतील रामबाग शिवसेना शाखेने सामाजिक, जातीय तेढ निर्माण होईल असा चित्ररथ तयार केला असल्याचा आक्षेप घेत शिवजयंती मिरवणूक कल्याण शहरातून शांततेत पार पडावी म्हणून येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी रामबाग शिवसेना शाखेचे भागवत बैसाने यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे.

रामबाग शिवसेना शाखेने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांचा समाचार घेणारा आणि संभाजी महाराज यांना आपल्याच लोकांमधील गद्दारीमुळे पकडले गेले असल्याचा देखावा चित्ररथावर चितारला आहे. यामध्ये संभाजी महाराजांबरोबर आपल्याच लोकांनी गद्दारी केली नसती तर आज भारत नव्हे जगाचा इतिहास वेगळा असता, अशी वक्तव्ये लिहिण्यात आली आहेत. या चित्ररथावर संभाजी महाराज औरंगजेबाला धडा शिकवतानाचा देखावा आहे.

हा चित्ररथ सोमवारच्या कल्याणमधील सार्वजनिक शिवजयंती मिरवणुकीत दाखल करण्यासाठी रामबाग शिवसेना शाखा सज्ज झाली होती. दोन दिवसांपासून पोलिसांनी रामबाग शिवसेना शाखेचे सर्वेसर्वा बंड्या साळवी यांना संबंधित चित्ररथ सामाजिक, जातीय तेढ निर्माण करणारा असल्याने तो मिरवणुकीत प्रदर्शित करू नये, अशी गळ घातली आहे. आपण फक्त वास्तव परिस्थितीचे दर्शन या चित्ररथावरील देखाव्यातून घडविले आहे. यात आक्षेपार्ह काही नाही, असे जिल्हाप्रमुख बंड्या साळवी यांनी पोलिसांना सांगितले आहे. हा चित्ररथ शिवजयंती मिरवणुकीत सहभागी व्हावा यासाठी रामबाग शिवसेना शाखा आग्रही आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांनी रामबाग शिवसेना शाखेचे भागवत बैसाने यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, प्रतिबंधात्मक आदेशाची नोटीस बजावली आहे.

सोमवारी शिवजयंती मिरवणूक काढण्यास कल्याण शहरातून परवानगी देण्यात आली आहे. ही मिरवणूक सुभाष चौक, मोहम्मद अली चौक, बाजारपेठ, पारनाका, अहिल्याबाई चौक ते शंकरराव चौक अशी निघणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन गटांमध्ये घोषणा, देखावे, फलक या कारणांवरून शत्रुत्व निर्माण होईल असे प्रकार घडून परस्परविरोधी गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शांतता राखावी यासाठी पोलीस आयुक्तांनी आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश जारी केला आहे. शिवजयंती मिरवणूक दिलेल्या वेळेत काढण्यात यावी. मिरवणुकीमध्ये तोंडी, घोषणा, देखावे, खुणा अशा कोणत्याही पध्दतीने इतर अन्य धर्म, वंश, जन्मस्थान, भाषा, जात अशा अनेक कारणांवरून शत्रुत्व निर्माण होईल, सार्वजनिक शांतता बिघडेल असे कृत्य करू नये. या सुचनांचे उल्लंघन झाल्यास, सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपणास त्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी तंबी आयोजकांना देण्यात आली आहे.