दोन लाखाच्या खंडणीसाठी पोलिसांनीच एकाचे अपहरण केल्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी दोन पोलिसांसह खबरीला अटक केल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख गौतम रणदिवे यांनी दिली.
भालचंद्र काशिनाथ पाटील (पोलीस हवालदार, ठाणे पोलीस मुख्यालय), कुमार हनुमंत पुजारी (पोलीस शिपाई, ठाणे नगर पोलीस ठाणे) आणि खबरी जिलू रेहमान उर्फ गब्बर मुज्जमिल हक (२७) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कल्याण-शिळ मार्गावरील पिसवली येथील रोहिदास भोईर चाळीत राहणारी पपीया मंडल हिने मंगळवारी दुपारी आपला पती राजा मंडल याचे अपहरण केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास तिघेजण घरी आले. आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत असे सांगून या त्रिकुटाने राजा मंडल यांना जबरदस्तीने सोबत ठाणे येथे नेले. ठाणे येथे त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्याकडील दोन्ही मोबाईल काढून घेण्यात आले. त्यातीलच एकाने शेजारी राहणाऱ्या सुरज धुमाळ यांच्या फोनवर फोन करून तुझ्या नवऱ्याला सोडवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक विलास शेंडे आणि त्यांच्या पथकाने प्रथम पोलिसांचा खबरी जिलू उर्फ गब्बर याला बुधवारी पहाटे ठाण्यातून उचलले. पोलिसी खाक्यानंतर त्याने दोन्ही पोलिसांची नावे सांगितली. या माहितीवरुन भालचंद्र पाटील आणि कुमार पुजारी या दोघांना ठाणे परिसरातून अटक करण्यात आली. कल्याण कोर्टाने या तिघांना २२ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा